जळगाव महापालिकेत स्थायी सभापती निवडीची चुरस; शिवसेना सदस्यांनी घेतली खडसेंची भेट 

सचिन जोशी
Thursday, 22 October 2020

एकीकडे सदस्यांची नाराजी व दुसरीकडे मनपात खडसेंना मानणारा गट यामुळे सभापती निवडीत फटका बसू शकतो, म्हणून कालच भाजप सदस्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. 

जळगाव: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी (ता.२१) भाजपचा त्याग करत राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा केल्यानंतर महापालिकेतील शिवसेना सदस्यांनी त्यांची मुक्ताईनगरला जाऊन भेट घेतली. मनपा स्थायी समिती सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला ही भेट झाल्याने आधीच या पदावरून भाजपत वाद असताना निवडीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. 

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड आज होणार आहे. या पदासाठी भाजपकडून माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह राजेंद्र घुगे- पाटील, नवनाथ दारकुंडे आदी इच्छुक होते. दरम्यान भाजपतील काही लेवा समाजातील नगरसेवकांनी गेल्याच आठवड्यात गिरीश महाजन यांची भेट घेऊन मनपातील निर्णय, आमदार राजूमामा भोळेंच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे सदस्यांची नाराजी व दुसरीकडे मनपात खडसेंना मानणारा गट यामुळे सभापती निवडीत फटका बसू शकतो, म्हणून कालच भाजप सदस्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. 

सभापती निवड होण्याच्या पूर्वसंध्येला खडसेंनी भाजपत्याग करत राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यात महाआघाडीत असलेल्या शिवसेनेला त्यामुळे बळ मिळाले. शिवसेना सदस्य व माजी सभापती नितीन बरडे यांनीही सभापती निवडीसाठी अर्ज भरला असून त्यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक यांच्यासोबत मुक्ताईनगरला जात खडसेंची भेट घेतली. या भेटीचा मनपा स्थायी समिती सभापती निवडीवर परिणाम होतो का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. अर्थात, तो होणार नसला तरी महापालिकेतील दीर्घकालीन राजकारणावर मात्र खडसेंच्या पक्षांतराचा निश्‍चित परिणाम होणार आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Shiv Sena members met Khadse in the election of Jalgaon Municipal Corporation Standing Committee