शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ‘टी’ आकारालाच मंजुरी !

कैलास शिंदे
Friday, 22 January 2021

शिवाजीनगराचा पूल ‘टी’ आकाराचाच करावा, याबाबत आता नागरिकांची मागणी वाढली आहे. नगरसेवकांनीही आता याबाबत प्रस्ताव दिला आहे.

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ‘टी’ आकाराचा नकाशा आमच्याकडे आहे. त्यालाच मंजुरी आहे. त्यामुळे नवीन नकाशा करण्याचा प्रश्‍नच नाही. केवळ या नकाशानुसार काम करायवयाचे की नाही, याबाबत आम्ही महापालिकेला विचारणा करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. शिवाजीनगर उड्डाणपूल ‘टी’ आकाराचा करायचा की ‘एल’ आकाराचा करायचा, याबाबत वाद निर्माण झाला आहे.

शिवाजीनगराचा पूल ‘टी’ आकाराचाच करावा, याबाबत आता नागरिकांची मागणी वाढली आहे. नगरसेवकांनीही आता याबाबत प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे या पुलाच्या रचनेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

नकाशाप्रमाणेच काम 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले, की राज्य शासनाने ‘टी’ आकाराच्या पुलाच्या बांधकामलाच मंजुरी दिली आहे. महापालिकेने हाच नकाशा आम्हाला दिला आहे. त्याप्रमाणेच निधीही मंजूर झाला आहे. त्यानुसारच काम करण्यात येणार आहे. 

‘एल’ आकाराचे काम सुरू 
सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केल्यानंतर शिवाजीनगर भागातील नागरिकांनी ‘टी’ आकाराच्या पुलाला विरोध केला. त्यामुळे जनतेचा विरोध लक्षात घेऊन ते काम थांबविण्यात आले व पुलाचे काम थांबू नये, यासाठी ‘एल’ आकारच्या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. 

महापालिकेची मंजुरी घेणार 
कामाला गती यावी, यासाठी बांधकाम विभागातर्फे ‘एल’ आकाराचा पूल बांधण्यात येत आहे. मात्र, या पुलाचे काम झाल्यावर आम्ही महापालिकेला विचाराणा करून ‘टी’ आकाराच्या कामाबाबत मंजुरी घेणार आहोत. महापालिकेने त्यास मंजुरी दिल्यास त्याप्रमाणे काम करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

 

विजेचे खांब स्थलांतरीतचा प्रश्न

विजेचा खांब हटविण्याच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिकेकडे 
पुलाच्या कामासाठी वीजखांब हटविण्याचा वाद सुरू आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले, की पुलाचे काम महापालिकेच्या हद्दीत असल्यामुळे वीजखांब हटविण्यासाठी येणारा खर्च महापालिकेकडून घेण्यात येणार आहे. शासनाच्या वीज विभागाने महापालिकेकडे खर्चाच्या मंजुरीचा प्रस्ताव दिला आहे. महापालिकेने खर्चाची रक्कम दिल्यानंतरच वीजखांब हटविण्यात येतील, असे वीज विभागाने कळविले आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivajinagar bridge T shape design approval