जळगाव शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलाचा होणार विस्तार 

सचिन जोशी
Monday, 23 November 2020

शिवकॉलनीजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा समावेश नव्हता. या साडेसात किलोमीटरच्या कामात केवळ हाच पूल सुटल्याने भविष्यात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

जळगाव : शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात सध्या अस्तित्वात असलेल्या शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्ताराचा समावेश नव्हता. मात्र, महामार्ग प्राधिकरणाने या पुलाच्या विस्तारीकरणाचा स्वतंत्र प्रस्ताव नागपूर कार्यालयाकडे पाठविला असून, त्याला आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली. त्यासाठी निधी मंजूर केल्यानंतर ६९ कोटींच्या या कामाचे कंत्राट जांडू कन्स्ट्रक्शन (हरियाना) या कंपनीला देण्यात आले आहे. खोटेनगर ते कालिकामाता चौक अशा साडेसात किलोमीटर टप्प्यातील कामाचा यात समावेश आहे. या कामात दोन ठिकाणी उड्डाणपूल, चार ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) व दोन ठिकाणी रोटरी सर्कल अशा रचनेनुसार काम होईल. 

शिवकॉलनी पुलासाठी पाठपुरावा 
कार्यादेश दिलेल्या कामात शिवकॉलनीजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा समावेश नव्हता. या साडेसात किलोमीटरच्या कामात केवळ हाच पूल सुटल्याने भविष्यात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता या कामासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला. शिवाय, सध्या अस्तित्वात असलेला पूलही खराब व जीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याला समांतर अशा पुलाच्या कामाचा मुद्दा समोर आला. महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव कार्यालयाने या कामासाठी स्वतंत्र साडेचार कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी नागपूर कार्यालयास पाठविला आहे. गेल्या चार महिन्यांपासून या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू असून, त्याला अंतिम मंजुरी येत्या आठवडाभरात मिळण्याची शक्यता आहे. 

मक्तेदारच करणार काम 
पुलासाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठविला असून, तो मंजूर झाला तरी त्यासाठी वेगळ्या निविदा मागवून कार्यादेश देण्याबाबत साशंकता आहे. त्यापेक्षा महामार्गाचे काम करणाऱ्या जांडू कन्स्ट्रक्शनलाच पुलाचे काम सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. अर्थात, या पुलाच्या प्रस्ताव मंजुरीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता तातडीने पाठपुरावा करण्याची गरज आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivkolni railway flyover to be expanded