श्रीराम रथोत्सवाची दीडशतकी परंपरा कायम; पण उत्‍सवाला मर्यादा

सचिन जोशी
Saturday, 7 November 2020

श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवाला १४७ वर्षांची परंपरा आहे. दर वर्षी कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशीला लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा होतो.

जळगाव : नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानचा दीडशतकी परंपरेकडे जाणारा श्रीराम रथोत्सव यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन आहे. मोजक्या अडीचशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा होणार असून, भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाऐवजी उत्सवाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. 
श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवाला १४७ वर्षांची परंपरा आहे. दर वर्षी कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशीला लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा होतो. यंदा मात्र सर्वच सण-उत्सवांवर कोविडचे सावट असल्याने या रथोत्सवाबाबत साशंकता आहे. 

जिल्हाधिकारी सकारात्मक 
या संदर्भात रथोत्सव समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. आमदार सुरेश भोळे यांच्यासह मंदिराचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज, समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, भरत अमळकर, विलास चौधरी, शिवाजी भोईटे, राकेश लोहार, राजू काळे, भाजपचे दीपक सूर्यवंशी या वेळी हजर होते. रथोत्सवाचे महत्त्व व परंपरेबाबत सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली. याबाबत लवकरच पोलिस अधीक्षक, पोलिस उपविभागीय अधिकारी, महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे श्री. राऊत यांनी सांगितले. 
 
असे असेल नियोजन 
सालाबादप्रमाणे दुपारी बाराला रथाची मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा होईल. नेहमीच्या मार्गाने रथ निघेल. रथ ओढण्यासाठी बजरंग दलाचे अडीचशे कार्यकर्ते ड्रेसकोडमध्ये असतील. त्याआधी सर्वांची आरोग्य तपासणी होईल. सायंकाळी सहापर्यंत रथ त्याच्या घरापर्यंत पोचेल. भक्तांनी प्रत्यक्ष दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन करत रथाचे फेसबुक व केबलवर लाइव्ह प्रक्षेपण होईल. वहनोत्सवही दररोज चौधरीवाडा ते तेलीवाडा एवढाच प्रवास करेल, असे नियोजन समितीने प्रशासनास दिले आहे. 
 
दीडशे वर्षांची परंपरा आहे, ती खंडित होऊ नये म्हणून सर्व नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती रथोत्सव समितीने केली आहे. जिल्हाधिकारी याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देतील, अशी अपेक्षा आहे. 
-सुरेश भोळे, आमदार 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shree ram rathotsav celibretion continue this year