चांदीच्या दरात वाढ...भाव जाणार लाखावर !

सचिन जोशी
Thursday, 6 August 2020

गेल्या १५ दिवसांतील तुलनात्मक दर बघता या काळात सोन्याचा भाव पाच ते सहा हजारांनी वधारला. दुसरीकडे चांदीची दरवाढ सुसाट सुरू झाली आहे.

जळगाव : सोन्यापेक्षाही आता चांदी भाव खाऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत चांदीचा दर तब्बल साडेतीन ते चार हजारांनी वाढला, तर सोन्यानेही सहाशे रुपयांनी उसळी घेतली. गेल्या आठवडाभरात चांदीला तब्बल आठ-नऊ हजारांच्या दरवाढीची चकाकी आली. अशीच दरवाढ सुरू राहिली तर दोन महिन्यांत चांदीसाठी प्रतिकिलो एक लाख रुपये मोजावे लागतील, अशी शक्यता व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. 
गेल्या चार महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, व्यवसायही पूर्वपदावर येत असताना सोने-चांदी भाव खाऊ लागले आहे. गेल्या १५ दिवसांतील तुलनात्मक दर बघता या काळात सोन्याचा भाव पाच ते सहा हजारांनी वधारला. दुसरीकडे चांदीची दरवाढ सुसाट सुरू झाली आहे. चांदीने गेल्या २४ तासांत साडेतीन-चार हजारांनी उसळी घेतली. 

चांदी जाणार लाखावर 
१९ जुलैस सोन्याचा दर ५१ हजार ७०० (प्रतितोळा), तर चांदी ५३ हजार ७०० (प्रतिकिलो) होती. गुरुवारी जळगावच्या बाजारपेठेत सोने ५६ हजार २००, तर चांदी ७५ हजार ५०० वर पोचली. म्हणजे चांदीचा भाव गेल्या १५ दिवसांत तब्बल २१ हजारांनी वाढला आहे. 

ही आहेत कारणे 
येत्या काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता असून, जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, कोरोनाचे संकट, आर्थिक मंदी व आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ ही यामागची कारणे असल्याचे सांगितले जात आहे. 

असा होता भाव (जळगाव बाजार, जीएसटीसह) 
सोने : ५६,२०० (प्रतितोळा) 
चांदी : ७५,५०० (प्रतिकिलो) 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon silver prices record growth and rate price will go up to lakhs