चक्‍क दुचाकीवरून दोन ब्रास मुरूम वाहतूक 

राजेश सोनवणे
Tuesday, 22 September 2020

जिल्हा परिषदेच्या मालकीचे पाझर तलाव, साठवण बंधारे तसेच विविध जलसिंचन प्रकल्पाच्या कामातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजे तसेच वाळूची वाहतूक करण्यात आलेली आहे. मात्र, यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून, कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्‍यांनी केला.

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात सिंचन विभागामार्फत करण्यात आलेल्या कामातून उपसा झालेल्या गौण खनिज वाहतुकीची माहिती मागविली असता यात बनवाबनवी झाल्‍याचे उघड झाले आहे. यात चक्क दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या परवान्यावर मुरूम आणि वाळू वाहतूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्‍याचे जिल्‍हा परिषद सदस्‍या पल्‍लवी सावकारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या मालकीचे पाझर तलाव, साठवण बंधारे तसेच विविध जलसिंचन प्रकल्पाच्या कामातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजे तसेच वाळूची वाहतूक करण्यात आलेली आहे. मात्र, यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून, कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्‍यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जि. प. अधिकाऱ्यांवर आरोप केले. माहिती अधिकारातून हा घोळ उघड झाला असून, याबाबत त्यांनी माहिती अधिकारातून मिळविलेली कागदपत्रे दाखविली. 

चालक एक, वाहने आठ 
दुचाकी, तीनचाकीच्या परवान्यांवरून चक्क दोन ते तीन ब्रासपर्यंत मुरूम आणि वाळू वाहतूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे एकच वाहनचालक एकाच वेळी आठ ते दहा वाहनांच्या स्टेअरींगवर दाखविण्यात आले आहे. हा वाहतूक करण्याचा अजब कारभार यातून उघड झाला आहे. 

पाझर तलावात रॉयल्टीचा घोळ 
पाझरा तलावाच्या कामातून मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा झालेला आहे. मुरूम उपाशासाठी ५० टक्के रॉयल्टी जिल्हा परिषदेकडे जमा करण्यात येते. जमा झालेल्या रॉयल्टीच्या पावत्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहिती अधिकारातून मागितल्या आहेत. परंतु ते देण्यास सिंचन विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला. कोट्यवधींचा हा रॉयल्टी घोटाळा असल्याचे आरोपही त्यांनी केला. रॉयल्टीचा प्रश्न जि.प.च्या प्रत्येक सभेत उपस्थित केला जातो. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या 
गौण खनिज वाहतुकीसाठी परवाने देण्यात आलेले आहेत. मात्र पाचोरा तहलीदार यांच्या नावाने बनावट शिक्के आणि स्वाक्षरीच्या माध्यमातून बोगस परवाने दिल्याचा आरोप श्रीमती सावकारे यांनी केला. महसूल विभागाच्या शिक्क्यांमध्ये ‘सत्येमय जयते’चा कोठेही उल्लेख नसून हा देशद्रोह आहे. या बाबत कारवाई करण्यात झाली पाहिजे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे पल्लवी सावकारे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon soil khanij in two brass transport in two whiler