esakal | जि.प.अध्यक्षांचे पतीसह स्पेशल लसीकरण ! आणि भाजप कार्यकर्त्यांचा घरचा आहेर

बोलून बातमी शोधा

vaccine
जि.प.अध्यक्षांचे पतीसह स्पेशल लसीकरण ! आणि भाजप कार्यकर्त्यांचा घरचा आहेर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
रावेर/चिनावल : एकीकडे राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या लसींचा तुटवडा असल्यामुळे अनेक केंद्रांवरील लसीकरण बंद आहे. शेकडो ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहून लस घ्यावी लागते किंवा लस उपलब्ध नसल्याने परत जावे लागते. मात्र, रावेर तालुक्यातील चिनावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस शिल्लक नसताना अन्य केंद्रातून लस आणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी आणि त्यांच्या पतींनी लस घेतल्याचा आरोप चिनावल येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तनुजा सरोदे यांचे पती श्रीकांत सरोदे यांनी केला आहे.

याबाबत आज पत्रकारांशी बोलतांना सर्वसामान्य नागरिकांना लस उपलब्ध नसताना फक्त अध्यक्षांसाठीच लस कशी उपलब्ध झाली, असा प्रश्न उपस्थित करून घरचा आहेर दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी श्री. सरोदे यांनी केली आहे.

जि.प. अध्यक्षांनी घेतला आढावा
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी बुधवारी तालुक्यातील चिनावल येथे भेट दिली. त्या वेळी त्यांनी कोरोनाचा आढावा घेऊन पंचायत समितीच्या सदस्या माधुरी नेमाडे यांच्यासह तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट दिली. या वेळी त्यांच्याबरोबर चिनावलच्या सरपंच भावना बोरोले, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ नेमाडे, तेथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष योगेश बोरोले आणि जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती पाटील यांचे पती प्रल्‍हाद पाटील हे होते. यावेळी जिप अध्यक्षांनी पतीसह लच टोचली.

सावद्यावरून लस आणली

सर्वसामान्य लोकांना लस मिळत नसताना जिल्हा परिषद अध्यक्षांना लस कशी मिळते? त्यांच्यासाठी खास बाब म्हणून सावदा येथून लस आणली गेली, मग सर्वसामान्य लोकांचे काय? यातून चुकीचा पायंडा पडत असल्याचे श्री. सरोदे म्हणाले.

चिनावल केंद्रावर साठाच नाही..
अधिक माहिती घेतली असता चिनावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसच शिल्लक नसल्याने तेथील लसीकरण बुधवारी बंद होते. मग श्रीमती पाटील यांना दिलेली लस कोठून आणण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चिनावल (ता. रावेर) हे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. येथूनच तालुक्यात लस वितरित होते. आपल्याच तालुक्यात लस घ्यायची म्हणून चिनावल येथे घेतली. विरोधक यात राजकारण करत आहेत-.
- रंजना प्रल्हाद पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद, जळगाव.