खडसेंच्या राजकीय भूमिकेच्या प्रतीक्षेतील ‘अल्पविराम’! 

सचिन जोशी
Monday, 12 October 2020

दोन आठवड्यांपूर्वी खुद्द शरद पवारांनी मुंबईतील बैठकीत खडसेंच्या प्रवेशाबाबत चाचपणी करून घेतली. त्यामुळे या चर्चेला वेग आलाय.

जळगाव ः गेला संपूर्ण आठवडाभर खडसेंच्या कथित पक्षांतराच्या चर्चेच्या गुऱ्हाळाने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले... अर्थात, त्याला निमित्तही होते खडसेंच्या मुंबई वारीचे. या मुंबई वारीबाबत वैद्यकीय तपासणी व पक्षाची बैठक अशी दोन्ही कारणे त्यांनी दिली. पक्ष बैठकीला ते व्हर्च्युअली हजरही राहिले, तरीही त्यांच्या पक्षांतराची चर्चा काही थांबली नाही... आता ते मुंबई वारी करून ‘मुक्ताई’ला परतले. त्यामुळे आपसूकच ही चर्चा थांबली असली तरी त्यांच्या संभाव्य निर्णयाच्या पूर्णविरामाच्या प्रतीक्षेतला हा ‘अल्पविराम’ आहे, एवढेच..! 
 
कुठल्याही संवैधानिक अथवा पक्षातील संघटनात्मक पदावर नसतानाही दीर्घ अनुभवी, अभ्यासू व वजनदार नेता म्हणून एकनाथराव खडसेंभोवती आजही राजकीय वलय कायम आहे. केवळ जिल्ह्यात, खानदेशातच नव्हे तर राज्यातील मीडियावरही त्यांचा प्रभाव आहे. पक्षातील ज्येष्ठ आणि अलीकडे गेल्या चार वर्षांत सातत्याने डावलल्याची भावना म्हणून पक्षनेतृत्वावर नाराज असलेले नेते म्हणून त्यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून असते. 
पक्षाच्या घटनेत बसत नसतानाही त्यांनी राज्यातील नेतृत्वावर त्यांच्यावरील अन्यायाबाबत वेळोवेळी कठोर टीकाही केलीय. गेल्या महिनाभरात तर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव घेऊन त्यांनी आरोप केला आणि त्यातूनच पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित प्रवेशाची चर्चा सुरू झाली. दोन आठवड्यांपूर्वी खुद्द शरद पवारांनी मुंबईतील बैठकीत खडसेंच्या प्रवेशाबाबत चाचपणी करून घेतली. त्यामुळे या चर्चेला वेग आलाय.कोरोना काळात ‘मुक्ताई’तील फार्महाउसमधून क्वचितच बाहेर पडणाऱ्या खडसेंनी परवा थेट मुंबई वारी केली. या वारीत ते पवारांना भेटणार व त्यांचा प्रवेश निश्‍चित होणार, अशी समीकरणे बांधली गेली. काहींनी तर या समीकरणांच्या आधारे ‘१२ ऑक्टोबर’चा मुहूर्तही निश्‍चित केला... खडसे मात्र आपण मुंबईत नियमित वैद्यकीय तपासणी व पक्षाच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीसाठी आल्याचे सांगत होते. मुंबईत असून प्रत्यक्ष न जाता ते या बैठकीस व्हर्च्युअली (ऑनलाइन) हजर राहिले. त्यामुळेही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेचे ढग अधिक गडद झाले. इकडे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्यांच्या स्वागताचे ‘स्टेटमेंट’ही देऊ लागले. 

झाली... खडसेंची मुंबई वारीही आटोपली... पण, या वारीतून अपेक्षित राजकीय निर्णय अजून तरी समोर आला नाही. हां..! या वारीत घडलेल्या आणखी एका राजकीय घटनेकडेही धुरीणांचे लक्ष गेलेच. खडसेंच्या स्नुषा व खासदार रक्षा खडसे यांनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना केळी फळपीक विम्याच्या धोरणाबाबत एक निवेदन दिले. खडसे थेट फडणवीसांवर हल्ला चढवत असताना, त्यांच्या स्नुषा थेट फडणवीसांना कशा काय भेटल्या? आता त्यांच्यातील भेटीचे कारण हे निवेदनच होते की वेगळे काही? याबद्दल आणखी तर्कवितर्क लढविणे सुरू झालेय. खडसेंची मुंबई वारी संपली... आता ती पुन्हा कधी होते? त्याकडे लक्ष लावून बसणे आणि तोपर्यंत खडसे जिल्ह्यात नेमके काय, काय करतात... त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे, एवढेच काय ते त्यांचे समर्थक, विरोधकांसह मीडियाच्या हाती आहे. नाही म्हणायला, फडणवीसांच्या १३ तारखेच्या जिल्हा दौऱ्यातूनही मीडियाला या विषयातील काही ‘राजकीय खाद्य’ नक्कीच मिळणार आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon There is still a question mark over whether Eknathrao Khadse will resign