जळगाव जिल्ह्यातील १३ हजार शेतकऱ्यांनी दिली चुकीची माहिती !

देविदास वाणी
Thursday, 29 October 2020

केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांपैकी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. या यादीत संबंधित व्यक्तींचे नाव समाविष्ट असल्याने आपण योजनेत वरील कारणामुळे पात्र असू शकत नाही.

जळगाव ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयकर भरणारे नोकरदार कर्मचारी असूनही चुकीची माहिती महसूल यंत्रणेला देण्यात आली. तयाद्वारे पी.एम. किसान योजनेचा लाभ घेतला गेला. जिल्ह्यातील १३ हजार १७२ शेतकऱ्यांनी तब्बल १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांचा लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घेतलेल्या लाभाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांनी १५ दिवसाच्या आत शासनाकडे परत करावी, अन्यथा महसूल कायद्यान्वये त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. 

सर्वच तहसीलदारांनी संबंधितांना नोटीस दिल्या आहेत. जे आयकर दाते शेतकरी ही रक्कम १५ दिवसात परत करणार नाहीत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करून रक्कम वसूल केली जाईल असेही नोटिशीत नमूद केले आहे 

पीएम किसान योजनेच्या निकषा प्रमाणे आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेस पात्र नाहीत. केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांपैकी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. या यादीत संबंधित व्यक्तींचे नाव समाविष्ट असल्याने आपण योजनेत वरील कारणामुळे पात्र असू शकत नाही. म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना- शेतकरी म्हणून मिळालेली रक्कम धनादेशाद्वारे ही रक्कम तहसील कार्यालयात १५ दिवसात जमा करावी लागणार आहे. 

 

चुकीची माहिती दिलेले तालुका निहाय शेतकरी असे 
ेतालुका--शेतकरी संख्या--शासनाने दिलेली रक्कम 
अमळनेर--११७१--१ कोटी ९ लाख २६ हजार 
भडगाव--७१३--६७ लाख ७८ हजार 
भुसावळ--५३५--५२ लाख ७० हजार 
बोदवड--३३९--३ लाख १९ हजार ४ हजार 
चाळीसगाव--१२०८--१ कोटी १४ लाख ४४ हजार 
चोपडा--७९९--७५ लाख ३६ हजार 
धरणगाव--७६९--७१ लाख २६ हजार 
एरंडोल--५५८--५४ लाख ७८ हजार 
जळगाव--१२३१--१ कोटी १९ लाख ९४ हजार 
जामनेर--१०८४---१ कोटी ९८ हजार 
मुक्ताईनगर--४५६--४३ लाख ८२ हजार 
पाचोरा--११२७---१ कोटी ३ लाख ८० हजार 
पारोळा--७६८--६८ लाख ६८ हजार 
रावेर--११७१--१ कोटी १५ लाख ६८ हजार 
यावल--१२४३--१ कोटी १८ लाख २० हजार 

एकूण--१३१७२--१२ कोटी ४८ लाख ५२ हजार 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon thirteen thousand farmers in jalgaon district gave wrong information