पाडळसरे प्रकल्पासाठी ३५ कोटींचा निधी वितरित 

पाडळसरे प्रकल्पासाठी ३५ कोटींचा निधी वितरित 

अमळनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधीअभावी पाडळसरे धरणाचे काम बंद असल्याचे आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे अजित पवारांनी तात्काळ वित्त विभागास ३५ कोटी निधी रिलीज करण्याचे आदेश दिले, एवढेच नव्हे तर येत्या मार्चपर्यंत ६० कोटी निधी पाडळसरे धरणासाठी रिलीज करावेत अशा सूचनादेखील त्यांनी केल्या.

पाडळसरे प्रकल्पाच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मुंबईत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १६ डिसेंबरला बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागास दिले. सदर बैठकीत आमदार अनिल पाटील, प्रकल्प संचालक श्री. शिंदे, डिझाइन चीफ इंजिनिअर, तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता मुंडे उपस्थित राहणार आहेत. 

पाडळसरेसाठी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून वेळ पडल्यास केंद्राकडून पैसा उपलब्ध करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची तयारी आपण ठेऊ असे संकेत श्री. पवार त्यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिष्टमंडळात जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, प्रा. अशोक पवार, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, पं. स. सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागूल, विनोद जाधव, एस. टी. कामगार संघटनेचे एल. टी. पाटील, कृ. उ. बा. संचालक विजय पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नीलेश देशमुख, हिंमत पाटील, गौरव पाटील, श्रीनाथ पाटील, योगेश भागवत, हिरालाल भिल, मुशीर शेख, शेखर पाटील, गजानन सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

कापूस व मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी 
अनिल पाटील यांनी अमळनेर येथे कापूस व मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन यांना सूचना करून अमळनेर येथे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याशिवाय मका खरेदी केंद्र अमळनेरात सोमवार(ता. १४)पासून सुरू करण्याचे आदेश दिल्याने आमदारांसह शिष्टमंडळाने अजित पवारांचे विशेष आभार मानले. 

दिनदर्शिकेचे प्रकाशन 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमीत्त आमदार अनिल पाटील यांनी ८०,००० दिनदर्शिका आपल्या मतदारसंघात वाटप करण्याचे नियोजन केले असून याच प्रकाशन मुंबई येथे श्री. पवार यांच्या हस्ते झाले. आमदार अनिल पाटील व अमळनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला, सर्वांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी सर्वांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला व मतदारसंघातील स्थिती देखील त्यांनी जाणून घेतली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com