
शहरातील कोविड रुग्णालयात जिल्हाभरातील "कोरोना'चे रुग्ण दाखल होत आहे. याठिकाणी अत्यवस्थ परिस्थिती अनेक रुग्ण दाखल केले जातात.
जळगाव : येथील कोविड रुग्णालयातील "कोरोना' वॉर्डात दाखल झालेल्या रुग्णावर "कोरोना'चे उपचार केले जात आहे. मात्र, त्या रुग्णास इतर आजार देखील जडलेले असल्याने त्या आजारांकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, रुग्ण अत्यवस्थ होते, प्रसंगी मृत्यूही ओढवतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (कोविड) रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. यातील बहुतांश जणांनी "कोरोना'वर मात केली असून, अनेकांना "कोरोना'मुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यासह देशभरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण बाधितांच्या प्रमाणात अत्यल्प आहे. यातच जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल होणाऱ्या बऱ्याच पॉझिटिव्ह रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, शुगर, हृदयरोग यासह विविध आजार जडलेले आहे. या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेकडून कोरोनावर पुरेपूर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांना पूर्वीपासून जडलेल्या आजारांकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या रुग्णाची प्रकृती हाताबाहेर जात आहे. या आजारांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा धक्कादायक प्रकार देखील कोविड रुग्णालयात उघडकीस आला आहे.
केवळ "कोरोना'वरच उपचार
शहरातील कोविड रुग्णालयात जिल्हाभरातील "कोरोना'चे रुग्ण दाखल होत आहे. याठिकाणी अत्यवस्थ परिस्थिती अनेक रुग्ण दाखल केले जातात. या ठिकाणी आरोग्य यंत्रणेकडून केवळ "कोरोना'वरच उपचार केले जात असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे
जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकाराचे अनेक विकार जडलेले आहे. या रुग्णांना कोविड रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनत चालली आहे. या रुग्णांना कोविड रुग्णालयात इतर आजारांवर देखील उपचार मिळावे, यासाठी प्रशासनाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.