
जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या तीस हजारांवर पोहोचली असली, तरी बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाच्या नियंत्रणामुळे जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर तीन टक्क्यांच्या खाली आला आहे. अत्याधुनिक सुविधा, बाधित रुग्णांच्या देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांवर २४ तास नियंत्रण असल्याने उपचार चांगल्या पद्धतीने होत आहेत.
जिल्ह्यात जिल्हा कोविड रुग्णालय व गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय ही दोन मोठी हॉस्पिटल्स आहेत. त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चोवीस तास ‘वॉच’ ठेवून असतात. यामुळे एकाही रुग्णाकडे दुर्लक्ष होत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १९४७ ऑक्सिजन बेड्सची निर्मिती झाली आहे.
जिल्ह्यात मुख्य कोविड केअर सेंटर महापालिका क्षेत्रात आयटीआय व इकरा महाविद्यालय, सोबत प्रत्येक तालुक्यात एक केअर सेंटर आहेत. महापालिकेच्या केअर सेंटरमध्ये प्राथमिक स्वरूपाचे उपचार केले जातात. रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली, तर एक ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका चोवीस तास तैनात असते. ती रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवून जिल्हा कोविड रुग्णालयात किंवा डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करते.
मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जिल्हा कोविड रुग्णालयात दोन कोटी रुपये खर्चून ऑक्सिजनयुक्त बेड्सची सुविधा तयार केली आहे. त्यात ६० बेड्स ‘आयसीयू’चे, तर ३४० बेड्स ऑक्सिजनचे आहेत. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातही २० बेड्स आयसीयू, तर २५० बेड्स ऑक्सिजनचे आहेत. एकूण १९४७ ऑक्सिजन बेड्स जिल्ह्यात आहेत. खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात एकूण बेड्सची संख्या १५ हजार आहे. जिल्हा रुग्णालयात १९०, डॉ. पाटील रुग्णालयात २०० परिचारिका व इतर कर्मचारीवर्ग आहे. दोन्ही रुग्णालयांत १०० डॉक्टर आहेत. तालुक्याच्या केअर सेंटरला प्रत्येकी एक डॉक्टर आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाबत माहितीसाठी ॲप विकसित केले आहे. त्यावर कोणत्या कोविड हॉस्पिटल्समध्ये किती बेड्स आहेत, ऑक्सिजनचे किती, व्हेंटिलेटरचे किती, कोणत्या तालुक्यांच्या कोविड सेंटरमधील माहिती उपलब्ध आहे. रुग्णवाहिका कोठे आहे, याचीही माहिती मिळते. यामुळे रुग्णांना बेड्स कोणत्या रुग्णालयात मिळू शकतात, याची माहिती डॉक्टरांसह सर्वसामान्यांना मिळून रुग्ण तेथे दाखल केला जातो.
कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णाचा स्वॅब घेतला जातो. त्याला लक्षणे कोणती आहेत, पूर्वीचा काही आजार आहे का? तो कोणा बाधिताच्या संपर्कात आला होता का? याची माहिती घेऊन लक्षणानुसार उपचार केले जातात. सौम्य लक्षणे असतील, तर गोळ्या देऊन घरीच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला जातो. श्वास घेण्यास त्रास होत असेल, इतर काही आजार असतील, तर त्यानुसार ऑक्सिजन किंवा उपलब्ध उपचारपद्धती अवलंबिली जाते.
आकडे दृष्टिक्षेपात
आतापर्यंत कोरोनामुक्त : २१,३४३
ॲक्टिव्ह रुग्ण : ७,५०३
एकूण रुग्णसंख्या २९,८६८
एकूण मृत्यू : ८४०
मृत्यूदर : २.९७ टक्के
शुगरचा त्रास तरी वाचलो!
माझे वय, मला असलेला शुगरचा त्रास अन् त्यात झालेला कोरोना संसर्गामुळे मी यातून जिवंत राहील किंवा नाही, याची मलाच खात्री नव्हती. माझ्यावर तातडीचे उपचार झाले. मी ८ दिवस आयसीयूमध्ये होतो. मात्र, डॉ. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या धीरामुळे माझे मनोबल वाढले व बरा झालो.
एक शेतकरी, रा. डांभुर्णी (वय ९५)
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.