
विकेल ते पिकेल योजनेंतर्गत जिल्ह्यात ३८ प्रकल्पांचे उद्दिष्ट असून, सध्या १९ प्रकल्प सुरू आहेत. पोकरांतर्गत जिल्ह्यात ४६० गावे समाविष्ट असून, त्याअंतर्गत ८६ कंपन्या कार्यरत आहे.
जळगाव : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६८ हजार ४२३ शेतकऱ्यांच्या ३६ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे २६ कोटी ७२ लाख ४१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.
आवश्य वाचा- सरकारमधील मंत्र्यांनी पीकविमा कंपन्यांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांची केली फसवणूक : महाजन
कृषी विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर हरभरा, तर ८० हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड होईल. विकेल ते पिकेल योजनेंतर्गत जिल्ह्यात ३८ प्रकल्पांचे उद्दिष्ट असून, सध्या १९ प्रकल्प सुरू आहेत. पोकरांतर्गत जिल्ह्यात ४६० गावे समाविष्ट असून, त्याअंतर्गत ८६ कंपन्या कार्यरत आहे असून, आतापर्यंत ४४ कोटी ४० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या वर्षी जिल्ह्यातील आठ हजार ९३४ शेतकऱ्यांनी केळी पीकविम्यासाठी नोंदणी केली आहे.
रब्बी हंगामासाठी बियाणे व खतांची अडचण येणार नाही, अशी माहिती मधुकर चौधरी यांनी दिली. सद्य:स्थितीमध्ये जिल्ह्यात आठ लाख ५३ हजार पशुधन आहे. सध्याच्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात शेळ्या व मेंढ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर गायी व म्हशींची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत एक लाख ५० हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून, जिल्ह्यात देशी गोवंश संवर्धन मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त डॉ. पाटील यांनी बैठकीत दिली. या वेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कृषी व कृषी क्षेत्राशी निगडित विविध योजनांचा आढावा घेतला. संजय पाटील यांनी आभार मानले.
संपादन- भूषण श्रीखंडे