हॉटेलमध्ये दोन गटांचा राडा; व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 December 2020

व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. व्हायरल झालेल्‍या व्हिडिओची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप अधिकारी यांनी टीम रवाना केली.

जळगाव : शहराला लागून असलेल्या खेडी शिवारातील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी व नगरसेवक सुनील माळी यांचे बंधू मुकेश माळी या दोन गटात किरकोळ वादातून राडा झाला. यावेळी अनिल चौधरींच्या समर्थकांनी पिस्तूल काढल्याने तणाव निर्माण झाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 
भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्‍या न्यू महिंद्रा ढाबा या हॉटेलमध्ये १३ डिसेंबरच्या रात्री साडेदहाच्या सुमारास  याठिकाणी अनिल छबिलदास चौधरी (रा. भुसावळ) व मुकेश दत्तात्रय माळी (रा. जळगाव) या दोघांच्या समर्थकांमध्ये जेवणानंतर किरकोळ वादातून हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. व्हायरल झालेल्‍या व्हिडिओची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप अधिकारी यांनी टीम रवाना केली. 

खुर्चीला लाथ मारली अन्‌
पोलीस तपासात ढाब्याचे मालक तुषार फकीरा बाविस्कर यांना पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले, की रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुकेश दत्तात्रय माळी (नगरसेवक सुनील माळी यांचा भाऊ) व त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार जेवणासाठी आले होते. थोड्याच वेळात अनिल चौधरी, भगत बालानी (रा. सिंधी कॉलनी जळगाव) यांच्या सोबतही ३ जण जेवणासाठी आले होते. जेवण आटोपल्यावर अनिल चौधरी यांनी खुर्चीला लाथ मारल्यावरून मुकेश माळी व अनिल चौधरी यांच्यात बाचाबाची सुरू झाली. दोघेजण एकमेकांवर धावून आले तेव्हा, अनिल चौधरी सोबत असलेल्या एका इसमाने कमरेतून हातात रिवॉल्‍व्‍हर काढले. त्यानंतर दोन्ही गटांनी आपसात भांडण मिटवून निघून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले असता केदारनाथ वामन सानप हा त्याच्या कमरेतून पिस्तुल हातात घेऊन भांडण करीत असताना दिसून आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon two groups in the hotel fight and video virus social media