esakal | विद्यापीठ प्रांगणात अभाविप कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट 
sakal

बोलून बातमी शोधा

abvp

धुळ्यात गेल्या महिन्यात अब्दुल सत्तार यांची गाडी अडविणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीची पुनरावृत्ती आज जळगावात आणि तीदेखील विद्यापीठाच्या प्रांगणात झाली. 

विद्यापीठ प्रांगणात अभाविप कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या वाहनासमोर आडवे होणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांची आज पोलिसांशी झटापट झाली. विद्यापीठ प्रशासकीय भवनासमोर हा गोंधळ झाला. कार्यकर्त्यांनी यावेळी सामंत, ठाकरे सरकार आणि कुलगुरुंच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. धुळ्यात गेल्या महिन्यात अब्दुल सत्तार यांची गाडी अडविणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीची पुनरावृत्ती आज जळगावात आणि तीदेखील विद्यापीठाच्या प्रांगणात झाली. 
कोविडच्या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांसमोरील प्रश्न, समस्याबाबत अभाविप कार्यकर्त्यांना उदय सामंत यांची भेट हवी होती. आज सामंत विद्यापीठात साडेतीनला येणार होते. प्रत्यक्षात ते साडेचारला आले. सुरवातीला विद्यापीठ प्रशासकीय भवनातील व्यवस्थापन परिषद सभागृहात त्यांनी परीक्षेचा आढावा घेतला. 

असा घडला प्रकार 
बैठकीनंतर सामंत यानी अवघ्या १० मिनिटात पत्रकार परिषद आटोपली आणि ते परतीला निघाले. त्यावेळी जोरदार पाऊस सुरु होता. भर पावसातच सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह पोलिस वाहनांचा ताफा निघाला. त्याचवेळी अभाविपचे १०- १२ कार्यकर्ते अचानक समोर आले आणि घोषणा देत सामंत यांच्या गाडीसमोर आडवे झाले. 

पोलिसांकडून बळाचा वापर 
सामंत यांच्या वाहनासमोर आडवे होणाऱ्या दहा-बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते अजिबात आवरले जात नव्हते. त्यात एक विद्यार्थिनीही होती. भर पावसात विद्यार्थ्यांनी तीव्र घोषणाबाजी करत सामंत यांचा निषेध नोंदविला. जवळपास दहा मिनिटे ही झटापट सुरु होती. कसेबसे विद्यार्थ्यांना बाजूला केल्यावर बाजूच्या पाच- सात फुटी रस्त्यावरुन सामंत, पालकमंत्र्यांची वाहने रवाना झाली. 

अटकेबाबत संभ्रम 
आंदोलनकर्त्यांमध्ये एका विद्यार्थिनीसह दहा-बारा विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर कारवाईचा अधिकार कुलगुरुंच्या सूचनेनंतरच प्राप्त होतो, त्यामुळे पोलिस या कार्यकर्त्यांना अटकेशिवायच तेथून निघून गेले. कार्यकर्ते सायंकाळी उशिरापर्यंत घोषणा देत प्रशासकीय भवनासमोर बसले होते. यावेळी प्रदेश सहमंत्री विराज भामरे, महानगर मंत्री रितेश चौधरी, जिल्हा सह संयोजक रिद्धी वाडीकर, नगरमंत्री आदेश पाटील, पवन भोई, सोहम पाटील, विद्यापीठ अध्यक्ष आदित्य नायर, हर्षल तांबट, संकेत सोनावणे, आकाश पाटील, मानस शर्मा, मयुर अलकरी हे विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते. 

भेट नाकारली म्हणून आंदोलन 
सामंत यांचे वाहन निघून गेल्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्याचठिकाणी ठिय्या आंदोलन देत सामंत, ठाकरे सरकार, कुलगुरुंचा निषेध केला. आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांबाबत निवेदन द्यायला आलो होता. पाच वाजेची वेळही सामंत यांनी दिली. परंतु, ऐनवेळी भेट नाकारली, त्यामुळे हे आंदोलन करावे लागले. सामंत यांना विद्यार्थ्यांचे प्रश्‍न ऐकायचे नव्हते, त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना वेळ दिला, कंत्राटदारांच्या भेटी घेतल्या.. पण विद्यार्थ्यांना भेटले नाही, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.