esakal | ‘वसाका’ पुन्हा बहरेल का? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव..
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant Cooperative Sugar Factory

‘वसाका’ पुन्हा बहरेल का? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


कासोदा : जिल्ह्यातील सात तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला आणि ४२१ गावातील चौदा हजारांवर सभासदांच्या मालकीचा २८२ एकर शेतजमिनीत वसलेला वसंत सहकारी साखर कारखाना (Vasant Cooperative Sugar Factory) आज भंगारखाना बनला आहे. एकेकाळी १ हजार २५० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला व सातशे कामगारांचा (Sugar workers) उदरनिर्वाह करणारा हा कारखाना राजकीय इच्छाशक्तीअभावी एक शोकांतिका बनला आहे. जिल्ह्यात ‘चोसाका’ला ऊर्जितावस्था प्राप्त होत असतानाच आता कामगारांसह शेतकऱ्यांचे डोळे ‘वसाका’कडे लागले आहेत. मात्र, त्यासाठी राजकीय स्तरावर मंथन होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: कापूस, मका,ज्वारीसह इतर पिके गेली वाया; पंचनाम्याची मागणी


वसंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना १९७३ मध्ये झाली. तर १९७६ ते १९७७ ला पहिले गाळप झाले. तेव्हापासून १९९८ ते १९९९ पर्यंत पूर्ण क्षमतेने गाळप झाले. त्यानंतर वसाका बंद झाला. नंतर पुन्हा २००७ ते २००८ या वर्षी गंगामाई शुगर फॅक्टरीला वसाका भाडेतत्त्वावर चालवायला दिला. त्यांनी देखील एकाच वर्षात सर्व सामान गुंडाळून काढता पाय घेतला.


नवा कोरा ‘डिस्टिलरी प्लांट’
या कारखान्याचा स्वतःचा ३० हजार लिटर क्षमता असलेला नवा कोरा डिस्टिलरी प्लांटही आहे. त्यात गंगामाई शुगर इंडस्ट्रीजने २००७ ते २००८ या वर्षी मशीनरित वाढ करून ३० हजार लीटरची क्षमता ४० हजारापर्यंत वाढविली. या कारखान्यावर जवळपास १८ ते १९ कोटी रुपये कर्ज होते. त्याच्या व्याजाचा जर हिशेब केला तर ते ५० ते ६० कोटीच्या आत बाहेर असू शकते. या कर्जामुळे गेल्या ४९ वर्षांत एकाही सभासदाला विकत घेतलेल्या एक हजार रुपयांच्या भागावर लाभांशाच्या रूपात एक दमडीही कारखान्याकडून मिळाली नाही. तरी देखील सभासदांनी त्यासाठी कधीही अट्टहास केला नाही. कारखाना मागील काळात झालेला अनागोंदी कारभार व भक्कम नेतृत्वाच्या अभावामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे.

हेही वाचा: कर्ज काढू,पण शेतकऱ्यांना मदत करू- अब्दुल सत्तार

कामगार, शेतकरी देशोधडीला
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी मातीमोल भावात दिल्या होत्या. ते आज देशोधडीला लागले. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या ते हवालदिल होऊन भटकंती करत करत वयस्कर होऊन गेले. काही मृत झाले तर काही वणवण भटकत आहेत. तर काहींच्या मुला-मुलींचे शिक्षण देखील अपूर्णच राहिले. वसाका बंद पडायला काही प्रमुख कारणे आहेत, त्यात प्रामुख्याने वारेमाप नोकरभरती, नियोजनाचा अभाव, आवश्‍यकतेपेक्षा जास्त सामानाची खरेदी यामुळेच वसाका डबघाईला गेला.

loading image
go to top