पायात वायर अडकली...तोल जावून पाण्यात पडला अन्‌ क्षणात संपले जीवन

राजेश सोनवणे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पट्टीचा पोहणारा असताना देखील त्‍याने वाचण्यासाठी केलेली धडपड कामी आली नाही. पायात अडकलेल्‍या वायरीमुळे शंकरचे जीवन संपले. जैनच्या रूग्‍णवाहिकेतून त्‍यास तात्‍काळ जिल्‍हा रूग्‍णालयात आणले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्‍यास मृत घोषित केले. 

जळगाव : पाण्याने भरलेल्‍या हैदाची सफाई करताना पायात वायर अडकली आणि यात घात झाला. या घटनेत मोहाडी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्‍यू झाल्‍याची घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडलीत. पट्टीचा पोहणारा असताना देखील त्‍याने वाचण्यासाठी केलेली धडपड कामी आली नाही. पायात अडकलेल्‍या वायरीमुळे शंकरचे जीवन संपले. 
मोहाडी (ता. जळगाव) येथील शंकर तुकाराम सपकाळे (वय ३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. शिरसोली रस्‍त्‍यावरील अनुभूती शाळेच्या आवारात डव्हाईन पार्कमधील तलावात शंकर हा साफसफाईचे काम करत असे. दरम्‍यान आज सकाळी साडेदहाच्या सुमारास तो तलाव सफाईचे काम करत होता. या तलावातून अंडरग्राउंड इलेक्‍ट्रिक सप्लायची वायर गेली आहे. सफाईचे काम करत असताना शंकरचा पाय या वायरमध्ये अडकला आणि त्‍याचा तोल गेला. यात तो तलावाच्या पाण्यात पडला. विशेष म्‍हणजे शंकर हा पट्टीचा पोहणारा होता. मात्र त्‍याच्या पायात वायर अडकलेली असल्‍याने त्‍याला पोहता आले नाही. परिणामी त्‍याची पाण्यात बुडून मृत्‍यू झाला. जैनच्या रूग्‍णवाहिकेतून त्‍यास तात्‍काळ जिल्‍हा रूग्‍णालयात आणले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्‍यास मृत घोषित केले. 

रूग्‍णालयात गर्दी
शंकर सपकाळे याचा मृत्‍यू झाल्‍याची बातमी गावात आणि घरच्यांना समजताच, घरच्यांनी तात्‍काळ रूग्‍णालय गाठले. शंकरचा मृतदेह पाहून पत्‍नी निता, आई अंजनाबाई, वडील तुकाराम सपकाळे, मुलगा देवांश, बहिण चंद्रभागा आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. शंकरचे दोन्ही मोठे भाऊ हे जैन कंपनीत कामाला आहेत. शंकरच्या मृत्‍यूप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon water tank wire got stuck in the foot and young boy death