esakal | विधवा सुनेचे लावले लग्न अन्‌ वारसाहक्काने दिली शेतजमीन
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

पातोंडा गावातील बिरारी परिवारातील द्वितीय पुत्र योगेश यांचा विवाह काही वर्षांपूर्वी अनिता हिच्याशी झाला होता. दोघांचा संसार सुखाने चालत असताना त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले फुलली. परंतु सुखी संसाराला नजर लागली आणि अचानक योगेशवर काळाने घाला घातला.

विधवा सुनेचे लावले लग्न अन्‌ वारसाहक्काने दिली शेतजमीन

sakal_logo
By
भुषण बिरारी

पातोंडा (ता.अमळनेर) : येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रल्हाद राजाराम बिरारी यांनी आपल्या वृद्धापकाळानंतर विधवा सुन व नातवंडाबाबत चिंता व्यक्त करून तिच्या भावी आयुष्याचा विचार सतावत होता. तारूण्यात विधवा झालेली सुन संपुर्ण आयुष्‍य कशी काढणार या विचारातून त्‍यांनी गावातीलच एका युवकाशी पुनर्विवाह लावून दिला. इतकेच नाही तर वारसा हक्‍क म्‍हणून संपत्‍तीची समान वाटणी करून देत विवाह लावून दिला.

पातोंडा गावातील बिरारी परिवारातील द्वितीय पुत्र योगेश यांचा विवाह काही वर्षांपूर्वी अनिता हिच्याशी झाला होता. दोघांचा संसार सुखाने चालत असताना त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले फुलली. परंतु सुखी संसाराला नजर लागली आणि अचानक योगेशवर काळाने घाला घातला. दुर्धर आजाराने त्याचे निधन झाले. एवढ्या तारुण्यात अनितावर विधवा होण्याची वेळ आली. आपण आहेत तोपर्यंत तीचा सांभाळ होईल; परंतु संपुर्ण आयुष्‍य ती कशी काढणार? हा विचार प्रल्‍हाद बिरारी यांच्यासमोर कायम उभा राहत होता.

निर्णय घेत मांडला प्रस्‍ताव
मुलांचे निधन झाल्‍याने लहान मुलांची जबाबदारी अनितावर पडली. एवढ्या तारुण्यात व उरलेल्या आयुष्यात सून व नातवंडाचे आयुष्य कसं व्यथित होईल? ही काळजी प्रल्‍हाद बिरारी यांच्यासमोर उभा होता. या विचारातून त्‍यांनी मोठ्या हिंमतीने गावातीलच कैलास पवार यांचा चिरंजीव रिक्षाचालक असलेला भूषण याच्याशी आपल्या विधवा सुनेच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास सासरकडील जेठ, दिर यासहित वराकडील मंडळींनी होकार देत या आगळ्यावेगळ्या विवाहास समंती दिली. 

अन्‌ प्रथम दिला वारसाहक्‍क
मयत मुलाचा वारस हक्क म्हणून सासऱ्याने सुनेला समानवाटणी करून नातवंडाना हक्क मिळवून दिला. दोन्ही नातवंडे यांचा संपूर्ण सांभाळ व जबाबदारी वराने मान्य करून येथील माहिजी देवी मंदिराच्या प्रांगणात मोजक्यात नातेवाईक व समाज बांधवांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. वधु पिता म्हणून प्राथमिक शिक्षक विलास चव्हाण यांनी कन्यादान केले. हा समाजाभिमुख सोहळा घडवून आणण्यासाठी सासरे प्रल्हाद बिरारी, जेठ दिनेश बिरारी, भरत बिरारी, मा.सरपंच संभाजी पाटील, योगेश पाटील, भूषण बिरारी, उपसरपंच सोपान लोहार, महेंद्र पाटील यांनी मोलाची भूमिका निभावली.

संपादन : राजेश सोनवणे
 

loading image