यावल येथे कापूस खरेदी केंद्रासंदर्भात हालचालींना वेग -सकाळ’चा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

साकळी (ता. यावल) येथे केंद्र सुरू होण्यासाठी आम्ही पूर्वीच प्रस्ताव दिला होता. सध्या लॉक डाऊनमुळे मजूरवर्ग मध्यप्रदेशात निघून गेला आहे. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मजूर उपलब्ध झाल्यास केंद्र सुरू करण्यास आपण तयार आहोत. 
- श्याम महाजन, संचालक, श्री साई रामजी जीनर्स, (साकळी, ता. यावल). 

यावल : जिल्ह्यात सीसीआयसह पणन महासंघामार्फत सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रावर आता नवीन नोंदणी बंद झाली असून, यावल तालुक्यात मात्र कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. दरम्यान 'सकाळ' ने या संदर्भात विषय लावून धरल्यामुळे साकळी (ता. यावल,ता.जळगाव) येथे खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात हालचाली गतिमान झाल्या आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी भाजपच्या शिष्टमंडळास येत्या दोन दिवसात केंद्र सुरू होईल, असे आश्वासन दिले आहे. 
आमदार शिरीष चौधरी यांनी येत्या दोन दिवसात केंद्र सुरू न झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी  जिल्हा उपनिबंधक एम.यू. राठोड यांचेशी संपर्क साधून, केंद्र त्वरित सुरू करणे संदर्भात सूचना केली. तालुक्यात आजपासून नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांकडे जाऊन पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खरेदी केंद्राअभावी काही शेतकऱ्यांनी भुसावळ, रावेर, चोपडा, जळगांव येथील केंद्रावर नाव नोंदणी केली. तर काहींनी खासगी व्यापाऱ्याकडे कापूस विक्री केला. त्यामुळे तालुक्यातील कापूस शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची यादी नाही. प्रशासनाने घरोघरी तपासणी, करून शिल्लक कापसाची यादी बनविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

सभापतींचा पाठपुरावा 
तालुक्यात यावल येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अशी माहिती येथील बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील यांनी 'सकाळ 'ला दिली. तालुक्यात कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अवहेलना होत आहे. त्यासाठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon yawal cotton center starting