लॉकडाउनला मानली संधी अन युवकाने बेरोजगारीवर केली मात !

देविदास वाणी
Wednesday, 16 September 2020

एका व्हाटस्‌अॅप गृपचे चार गृप झाले. या सर्व गृपवर त्यांनी हक्काचे हजार ते बाराशे ग्राहक कायमस्वरूपी जोडले. ते आताही किराणा माल घरी पोचविण्यास सांगतात

जळगाव ः मनात जिद्द, चिकाटी अन् मेहनत करण्याची तयारी असली, तर लॉकडाउनच्या काळाचेही बंधन आपल्या ध्येयाच्या आड येऊ शकत नाही. साकेगाव (ता. भुसावळ) येथील एका बेरोजगार युवकाने लॉाकडाउनचा काळ ही संधी मानत बेरोजगारीवर मात करीत घरपोच किराणा पोचविणे सुरू केले. त्यातूनच डेअरी, पाण्याचा जार विक्रीचा व्यवसायही सुरू केला आहे. बेरोजगार युवकांनी त्याची धडपड ही आदर्श ठरणारी आहे. 

साकेगावचा प्रवीण पाटील हा विज्ञान शाखेतून बारावी झाला. आय.टी.आय. उत्तीर्ण झाला. मात्र, नोकरी कोठे मिळत नव्हती. वडिलांचे लहानसे किराणा दुकान होते. मात्र, त्याद्वारे घराचा उदरनिर्वाह चालणार नव्हता. त्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरू झाले. सर्वच बंद. केवळ किराणा, दूध अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या. किराणा माल घरपोच पोचविण्यास शासनाने परवानगी दिली असल्याने प्रवीण पाटील यांनी बंधू जितेंद्र पाटील याच्या मदतीने ‘घरपोच किराणा’ दिला तर आपले व्यवसाय वाढेल, असा विचार केला. किराणा पोचविण्यासाठी वाहन हवे होते.

नातेवाईक, इतरांकडून उधार, उसनवार करून वाहन घेतले. कोरोनामुळे नागरिकांसाठी चार व्हाट्‌सअॅप गृप तयार केले. त्यात त्यांना ‘किराणा मालाची यादी टाका, घरपोच किराणा मिळेल’ असे आवाहन केले. नागरिकही त्यांना प्रतिसाद देत किराणा मालाच्या याद्या पाठवीत गेले. नागरिकांनी याद्या देताच एका तासाच्या आत त्यांना चांगला प्रकारचा किराणा पोचविण्यात आला. एखादी वस्तू खराब निघाली, तर लागलीच ती बदलून देण्यात आली. यामुळे ग्राहकांचा विश्‍वास संपादन झाला. या सेवेमुळे एका व्हाटस्‌अॅप गृपचे चार गृप झाले. या सर्व गृपवर त्यांनी हक्काचे हजार ते बाराशे ग्राहक कायमस्वरूपी जोडले. ते आताही किराणा माल घरी पोचविण्यास सांगतात. मातृभूमी किराणा, दूध डेअरी, पाण्याचे जार अशा नावाने हा व्यवसाय आहे. किराणा मालासोबत त्यांनी दुधाचीही विक्री सुरू केली आहे. ज्यांना दूध हवे असते, ते दुधाची ऑर्डर करतात. दुकान व अंतर पाहून अर्धा ते एक तासातही दूध घरपोच दिले जाते. किराणा घरपोच पोचविण्याच्या बळावर आता त्यांनी दूध डेअरीही सुरू केली आहे. 
 

मी अगोदर पेपर वाटायचो. बारावी, आयटीआय झाल्यानंतर नोकरी नव्हती. मात्र, व्यवसाय करण्याची जिद्द होती. त्यासाठी मेहनतीची तयारी होती. कोरोना लॉकडाउनच्या काळात या जिद्दीला, माझ्या महत्त्वाकांक्षेला बळ मिळाले. मी घरपोच किराणा देणे सुरू केले, ग्राहकांनी प्रतिसाद दिला. आता तब्बल तीन व्यवसाय करीत आहे. 
- प्रवीण पाटील, संचालक 
मातृभूमी किराणा, डेअरी, जार एजन्सी. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon youth considered the lockdown as an opportunity to start a new business