esakal | खडसे राष्ट्रवादीत येण्यास जळगाव जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते उत्सुक !
sakal

बोलून बातमी शोधा

खडसे राष्ट्रवादीत येण्यास जळगाव जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते उत्सुक !

आजवरच्या राजकीय वाटचालीत अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आक्रमक नेतृत्व आणि मुरब्बी राजकारणी म्हणून श्री. खडसेंची ओळख राहिली आहे. मात्र, गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून खडसेंना भाजपत सतत डावलले जात आहे.

खडसे राष्ट्रवादीत येण्यास जळगाव जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते उत्सुक !

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादी खडसेंना आश्रय देऊ शकते. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांना आहे. यामुळे श्री. खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

भाजपतील पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे नाराज असलेले खडसे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच खडसेंच्या प्रवेशाबाबत जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना मुंबईत बोलावून चर्चा केली. श्री. खडसेंचा प्रवेश राष्ट्रवादीसाठी कसा असेल, याबाबत त्यांची मते जाणून घेतली. यामुळे सध्या राज्यात खडसेंचा प्रवेशाचा विषय गाजत आहे. 

भाजपकडून न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून खडसेंनी यापूर्वी अनेकदा पक्षांतराचे संकेत उघडपणे दिले. परंतु, अद्यापही ते भाजपतच आहेत. मात्र, खडसेंनी पुन्हा एकदा भाजप श्रेष्ठींकडे न्याय मागण्याची भूमिका घेतली आहे. नाराज खडसेंना राष्ट्रवादी घेतले तर पक्षाला जळगासह खानदेशात, राज्यात फायदा होऊ शकतो, अशी आशा श्री. पवारांना आहे. त्यांना पक्षात घेतल्यास काय पक्षाची स्थिती काय असेल, याबाबत जिल्ह्यातील नेत्यांकडून श्री.पवारांनी मते जाणून घेतली आहे. आगामी काळात होणारी जिल्हा बँक, दूध संघाची निवडणूक, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होऊ शकेल, असे काहींचे म्हणणे ओह. आजवरच्या राजकीय वाटचालीत अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आक्रमक नेतृत्व आणि मुरब्बी राजकारणी म्हणून श्री. खडसेंची ओळख राहिली आहे. मात्र, गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून खडसेंना भाजपत सतत डावलले जात आहे. ते पक्षात आले, तर त्यांचे स्वागतच असल्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले. 

... तर खडसेंचे स्वागतच 
ॲड. रवींद्र पाटील (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) ः मुंबईत पक्षश्रेष्टींनी एकनाथराव खडसेंचा प्रवेशाबाबत जिल्हापदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. प्रत्येकाचे अनुभव पक्षश्रेष्ठींनी जाणून घेतले. प्रवेशाविषयी गांभीर्याने या विषयावर चर्चा झाली नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी श्री. खडसेंचे काय बोलणे झाले, याची माहिती नाही. श्री. खडसे राष्ट्रवादीत आल्यावर पक्ष व संघटना वाढत असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. 

आता निर्णय पक्षश्रेष्ठींकडे 
गुलाबराव देवकर (माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस) ः भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आपला कोणताही विरोध नाही. ते पक्षात आल्यास राज्यात त्यांचा पक्षाला कोठे व कसा फायदा होईल, हे जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले. त्यांच्या प्रवेशामुळे राज्यासह जळगाव ग्रामीण मतदारसंघाला फायदाच होणार आहे. आता निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावयाचा आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top