रस्तालूट झाल्याचा बनाव बँक कर्मचाऱ्याच्या अंगलट 

सुरेश महाजन
Tuesday, 6 October 2020

पोलिसांचे प्रश्न सुरू झाले आणि तेथेच बिंग फुटले. पोलिसांनी मग ‘पोलिसी खाक्या’ दाखविताच त्याने गारखेड्याजवळील रस्त्याच्या कडेला लपविलेले पैसे काढून दिले.

 जामनेर : दरोडेखोरांनी रस्त्यात मारहाण करून वसुलीचे सव्वा लाख रुपये लुटण्यात आल्याचा बहाणा पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. परिणामी बंधन बँकेचा वसुली कर्मचारी हितेश रामेश्वर देशमुख (रा पारळ, ता. भोकरदन, जि. जालना) याला गजाआड व्हावे लागले. 

गारखेडा (ता. जामनेर) येथून बँकेच्या कर्जदाराकडून वसुलीचे सव्वालाख रुपये आणत असताना भुसावळ- जामनेर रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी माझा पाठलाग करून दुचाकीला लाथ मारून खाली पाडले आणि माझ्या जवळचे १ लाख २५ हजार रुपये लंपास केले, असा घटनाक्रम सांगून बंधन बँकेचा वसुली कर्मचारी हितेश देशमुख याने पोलिसात फिर्याद दिली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान घडल्याचे त्याने सांगितले. त्यावरून लागलीच पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी रस्तालुटीची तक्रार असल्याने सोबत सहायक फौजदार किशोर पाटील, पोलिस कर्मचारी विलास चव्हाण, चंदू पाटील, मनोज धनगर, अमोल वंजारी व गृहरक्षक दलाचे राहुल शिंदे, स्वप्निल चौधरी, असा लवाजमा घेऊन घटनास्थळी पोहोचले.

अन बिंग फुटले

घटना कोठे व कशी घडली, याविषयी पोलिसांचे प्रश्न सुरू झाले आणि तेथेच बिंग फुटले. पोलिसांनी मग ‘पोलिसी खाक्या’ दाखविताच त्याने गारखेड्याजवळील रस्त्याच्या कडेला लपविलेले पैसे काढून दिले. तसेच कंपनीचे लॅपटॉप, बॅग आदी साहित्य एमआयडीसीजवळ ठेवले होते, तेही पोलिसांना संशयित देशमुख याने काढून दिले. त्यामुळे रस्तालूट होऊन सव्वालाख रुपयांवर खोट्या बहाण्याने डल्ला मारू पाहणारा प्रकार पोलिसांच्या कसून चौकशीमुळे उघड होऊन गुन्हा दाखल होऊन गजाआड व्हावे लागले.  

 

संपादान- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner Bank employee pretends to have been robbed, police reveal the truth