‘बीएचआर’च्या जमिनींची गिरीश महाजनांकडूनही खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

गेल्या दीडच महिन्यात बाजारभावात कोट्यवधींची किंमत असलेल्या पतसंस्थेच्या ताब्यात असलेल्या जमिनी मातीमोलात काहीच दिवसांपूर्वी पतसंस्थेच्या अवसायक आणि इतरांच्या मदतीने घेतल्या आहेत.

जामनेर (जळगाव) : राज्यात गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता असलेल्या कोट्यवधींच्या जमिनी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी कवडीमोल घेतल्या. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनाही मिळवून दिल्याचा खळबळजनक आरोप माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी बुधवारी (ता. २) पत्रकार परिषदेत केला. 
त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने बीएचआर घोटाळ्याच्या चौकशीतून निघालेली ‘धग’ जामनेरपर्यंत पोचल्याचे दिसत आहे. 
 
महिनाभरात मातीमोल 
श्री. ललवाणी म्हणाले, की गेल्या दीडच महिन्यात बाजारभावात कोट्यवधींची किंमत असलेल्या पतसंस्थेच्या ताब्यात असलेल्या जमिनी मातीमोलात काहीच दिवसांपूर्वी पतसंस्थेच्या अवसायक आणि इतरांच्या मदतीने घेतल्या आहेत. शहापूर-फत्तेपूर रोड आणि बोदवड रोडलगतच्या या मोक्याच्या ठिकाणांवरील जमिनी आहेत. 
 
उताऱ्यावर महाजनांचे नाव 
उताऱ्यावर गिरीश महाजन-साधना महाजन यांची नावे आहेत. गट क्रमांकसह खरेदीबाबतची माहिती आजही सर्वांना ऑनलाइन पाहता येते. माझ्याजवळ कागदोपत्री पुरावे आहेत. यातील बरीचशी माहिती तपासकर्त्या अधिकाऱ्यांना मी दिलेली आहे, असेही ललवाणी म्हणाले. 
 
कार्यकर्त्यांच्या नावेही खरेदी 
जामनेर शहरासह परिसरात त्यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत. आधी कार्यकर्त्यांच्या नावावर खरेदी करायची आणि नंतर आपल्या स्वतःच्या नावावर करण्याची त्यांची पद्धत आहे. पुण्यातील ढोले-पाटील रस्त्यावरील जमीनही सुनील झंवरच्या माध्यमातून घेतली असून, आज तिची किंमत १०० कोटींवर आहे. तुम्ही जर धुतल्या तांदळासारखे आहात, तर मग तुमचे काही कार्यकर्ते भूमिगत का झाले, याचाही खुलासा व्हावा, असे आव्हान त्यांनी दिले. 
 
तपास अधिकाऱ्यांना दिली माहिती 
दोन दिवसांपासून श्री. ललवाणी यांना चौकशी पथकाने अटक वा ताब्यात घेतल्याबाबत उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. त्याबाबतही त्यांनी खुलासा केला. अधिकाऱ्यांनी मला पुण्याला नेले होते. मी त्यांना काही कागदपत्रे सादर करून, तोंडी माहितीही दिली. 
 
जामनेर पालिकेतही मोठा घोटाळा 
बीएचआरमधील घोळास बऱ्याच अंशी गिरीश महाजनच जबाबदार असल्याचे सांगून श्री. ललवाणी यांनी जामनेर पालिकेतीलही आर्थिक गैरव्यवहार मी पुराव्यांसह उघड करणार असल्याचाही दावा केला. 
 
आपली पात्रता ओळखून पारस ललवाणी यांनी आरोप करावेत. चार वर्षांपूर्वी पुण्याच्या भन्साली नामक व्यक्तीने लिलावाद्वारे जामनेरातील जमीन विकत घेतली होती. ती जमीन त्यांनी विक्रीस काढली असता कोणी घ्यायला तयार नव्हते. ती जमीन आमदार गिरीश महाजन यांनी कायदेशीररीत्या विकत घेतली, त्यात गैर काय? कोणताही बेछूट आरोप करताना पुरावा देणे गरजेचे असताना माजी मंत्री महाजन यांच्यावरील आरोपात तथ्य नाही. चौकशीतून सत्य जनतेसमोर येईलच. 
-चंद्रकांत बाबिस्कर, तालुकाध्यक्ष, भाजप, जामनेर 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner bhr's lands were also purchased from Girish Mahajan