कुटूंब कार्यक्रमात; चोरट्यांनी भरदिवसा लांबविले १५ लाख

शंकर भामेरे
Saturday, 10 October 2020

पोलीस नेहमीच जनतेच्या सोबत आहेत. गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने करून दोषींवर योग्य ती कारवाई करू. तपासकामी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. नागरीकांनी बाहेर गांवी जाताना रोख रक्कम घरी न ठेवता बैकेत ठेवावी.

- सचिन गोरे, अप्पर पोलिस अधिक्षक

पहूर (जळगाव) : पहूर (ता. जामनेर) येथील ख्वाजानगर भागातील रहिवासी शेख सलीम शेख गणी यांच्या राहत्या घरातून भर दिवसा १५ लाखाची रोकड अज्ञात चोरच्यांनी लंपास करून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर काकडे यांनी भेट देऊन इमारतीच्या परिसराची पाहणी करताना गवतामध्ये लोखंडी टॅमी सापडली .या टॅमीचा उपयोग सदर घरफोडी साठी केल्याचा पोलीसांचा कयास आहे . 
पहूर येथील शेख सलीम यांचे खॉजानगर भागात घर आहे. त्यांनी नुकताच फ्लॅटचा व्यवहार केल्याने १५ लाखाची रोख रक्कम घरात होती. गुरुवारी सकाळी अकराला ते कुटूंबियांसह जळगावी मुक्कामी गेले होते. त्यांनी त्यांचा लहान भाऊ सद्दाम यास रात्री घराकडे फेरी मारून लक्ष देण्याचे सांगितले. 

त्‍यांना दिसल्‍या दरवाजावर खुणा
दरम्यान, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शेख सद्दाम, शेख रफिक, शेख रईस हे तिन्ही भाऊ देखील जळगाव येथे कार्यक्रमासाठी गेले होत. शेख सलीम हे कार्यक्रम आटोपून घरी परतले असता त्यांना घराच्या प्रवेशद्वाराचा मुख्य दरवाजा उडघण्याचा प्रयत्न करण्याच्या खुणा आढळून आल्या. घरात शिरताच स्वयंपाक गृहाचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी कपाटाची पाहणी केली. त्यातील १५ लाख ८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांना समजले. या घटनेचा त्यांना धक्काच बसला. 

पोलिस आले आणि सुरू झाला तपास
घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, अमोल देवढे, संदीप चेडे, शशीकांत पाटील घटनास्‍थळी आले. अवघ्या तासाभरात पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी देखील भेट दिली. रात्री उशिरा श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी शेख सलीम शेख गणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल देवडे करीत आहेत. तपास कामी पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदवून तपासाची दिशा निश्चित केल्याचे समजते.

घटनास्थळावरून लोखंडी टॅमी जप्त
आज सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. या दरम्‍यान गवतामध्ये फेकलेली लोखंडी टॅमी आढळून आली. घरफोडीसाठी या लोखंडी सळईचा वापर केल्या गेला असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. त्या दिशेने तपास चक्रे सुरू आहेत..

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner family in program and 15 lakh cash robbery house