तो हुंदके देत म्‍हणत राहिला..वडिलांना हिरावले...आजीही सोडून गेली...आता काय करू...

शंकर भामेरे
Saturday, 8 August 2020

पहूर- कसबे येथील लेलेनगरात राहणाऱ्या पन्‍नास वर्षीय गृहस्थाचा गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास जळगाव येथील कोवीड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर जळगाव शहरात शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

पहूर (ता. जामनेर) : दोन दिवसांपूर्वी कोरोना आजाराने माझ्या वडिलांना हिरावले...अन्‌ आज माझ्या आजीचाही कोवीड रुग्णालयातच बळी गेला...आता आम्ही काय करावे? हुंदके देत सांगत होता पहूर कसबे येथील लेलेनगर महात्मा फुले तेलबिया संस्थेच्या बाजूला राहणारा चिमुकला...त्याचे टाहो फोडत रडणे पाहून उपस्थितांची मनं हेलावून गेली.
पहूर- कसबे येथील लेलेनगरात राहणाऱ्या पन्‍नास वर्षीय गृहस्थाचा गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास जळगाव येथील कोवीड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर जळगाव शहरात शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मोलमजुरी करून तसेच कधी मिस्तरीच्या हाताखाली बांधकामावर..तर कधी फवारणीसाठी दुसऱ्याच्या शेतावर... अशा प्रकारे हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होते. 

आईचा फॅक्‍चर अशात रिपोर्ट पॉझिटीव्ह
अशातच त्यांच्या वयोवृद्ध आईचा पाय फॅक्चर झाला. पायावरील उपचार सुरू असतानाच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जळगाव येथे कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्या कुटुंबातील इतरांचेही स्वॅब घेण्यात आले. त्यात वृद्धेचा मोठा मुलगा बाधीत आढळल्याने त्यांनाही जळगावला उपचारार्थ दाखल करण्यात आले. आई आणि मुलावर उपचार सुरू असताना.....

पुन्हा तोच आवाज अन्‌ तेच शब्‍द
६ ऑगष्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता कोवीड रुग्णालयातून डॉक्टरांचा फोन आला... बाळा तुझे वडील तूला सोडून गेले... सकाळी अंत्यसंस्कार करण्यासाठी जळगावला येऊन जा. स्वतःला सावरा असा धीर देत डॉक्टरांनी फोन बंद केला. प्रशासनाच्या नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार झाले. वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन घरी आल्यावर पुन्हा शुक्रवारी रात्री साधारण अकराच्या सुमारास डॉक्टरांचा फोन आला...बाळा तुझ्या आजींची तब्येत थोडी सिरीयस आहे. सकाळी भेटायला येऊन जा...मात्र सकाळ व्हायच्या आतच पुन्हा रात्री एक वाजेच्या सुमारास तोच आवाज ऐकायला आला...बाळा तुझी आजी तुम्हाला सोडून निघून गेली....सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तुम्ही या...भरल्या डोळ्यांनी आजीवरही जळगांव येथेच अंत्यसंस्कार केले.

आजीची गोधडी आठवणीत
आयुष्यभर गोधड्या (झावरी) शिवून पोटाची खळगी भरणाऱ्या आजीचाही वडीलांपाठोपाठ एक दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या गरीब कुटुंबाला आज धीर देणे गरजेचे आहे. आजीची गोधडी हीच आता आठवणीत राहिली.

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner father and Grandma death corona positive child crying