‘मेडिकल हब’चे आठशे कोटी आघाडी सरकारने घेतले परत- माजी मंत्री महाजन  

सुरेश महाजन
Monday, 12 October 2020

अद्ययावत यंत्रणांसह माझ्या स्वप्नातील हॉस्पिटल सुरू होत असल्याने स्वप्न साकार झाल्यासारखे वाटत असल्याचेही माजी मंत्री महाजन यांनी सांगितले. 

जामनेर : राज्यातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारने जळगाव येथील ‘मेडिकल हब’साठी तब्बल आठशे कोटी रुपये दिले होते. तो आलेला पैसा आघाडी सरकारने परत घेतल्यामुळे जामनेरला अद्ययावत सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटलचा निर्णय घेतला असे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत सांगितले. मंगळवारी (ता. १३) राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल व नर्सिंग महाविद्यालयाचा उद्‍घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत श्री. महाजन बोलत होते. 

व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, दिलीप खोडपे, गोविंद अग्रवाल, अॅड. शिवाजी सोनार, शिक्षणसंस्थेचे सचिव जितू पाटील, उपनगराध्यक्ष अनिस केलेवाले, डॉ. प्रशांत भोंडे, श्रीराम महाजन, मुश्ताक भंगारवाले, अमृत खलसे, तुकाराम निकम, अमर पाटील, संजय देशमुख, आतिष झाल्टे, प्रा. शरद पाटील, अरविंद देशमुख, स्वीय सहाय्यक संतोष बारी, दीपक तायडे आदी होते. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण आरोग्यसेवेचा कोरोनाकाळात बोजवारा उडाला असून, मुख्यमंत्र्यांसह मंत्री घरूनच कारभार हाकत आहेत. मात्र, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरून कार्य करीत असल्याचेही ते म्हणाले.

 

आता दवाखान्याच्या कामासाठी पुणे-मुंबईसारख्या शहरात जाण्याची गरज नाही. २१० ऑक्सिजन मल्टिबेड, चोवीस तास सेवा, सर्व अद्ययावत यंत्रणांसह माझ्या स्वप्नातील हॉस्पिटल सुरू होत असल्याने स्वप्न साकार झाल्यासारखे वाटत असल्याचेही माजी मंत्री महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले. आरोग्यसेवक रामेश्वर नाईक यांनी केलेल्या मनोगतात हॉस्पिटलविषयी विस्तृत माहिती दिली. भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस रवींद्र झाल्टे यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीला तालुकाभरातून प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner Former minister Girish Mahajan has accused the BJP government of withdrawing funds for a medical hub