
कोरोना संकटाच्या काळात शासनाच्या आदेशानुसार गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कमी उपस्थितीमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. आता बहुतांश बंधने शासनाकडून शिथिल करण्यात आली असली तरी येथील कामकाजावर कुठलाही सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही.
जामनेर (जळगाव) : शहरातील तालुका भूमि अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराबाबत अनेक तक्रारी असताना आता त्यात आणखी समस्यांची भर पडली आहे. या कार्यालयातील इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून जमिनीच्या मोजणीसह विविध कागदपत्रे आणि मोजणी दाखलेही मिळत नसल्याने जनता पुरती हैराण झाली आहे.
आधीच कोरोना संकटाच्या काळात शासनाच्या आदेशानुसार गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कमी उपस्थितीमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. आता बहुतांश बंधने शासनाकडून शिथिल करण्यात आली असली तरी येथील कामकाजावर कुठलाही सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही. आधीच या एकमेव विभागाबाबत जनतेच्या नेहमीच सर्वात जास्त तक्रारी असतात त्यात आता भर पडली. ती कार्यालयातील इंटरनेट सेवा बंद राहण्याची. येथे तब्बल दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा बंद आहे. गेल्या सहा महिन्यांचे इंटरनेटचे बिल तेथील कार्यालय सहाय्यक असलेल्या गिरी यांनी स्वतःच्या खिशातून भरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठांकडून आम्हाला अजूनही निधी प्राप्त झाला नसल्याचा खुलासा यावेळी गिरी यांनी 'सकाळ'शी बोलताना केला. तालुक्यात अनेकांना प्लॉट शेतीची मोजणी काहींच्या आपापसातील वाद-विवाद, त्यामुळे तत्काळ जमीन मोजणीची कामे त्यासाठीचा पुरावा म्हणून दाखले द्यावे लागतात, आदी आवश्यक कामे भूमिअभिलेख अधिकाऱ्यांच्या दाखल्या अभावी दोन महिन्यांपासून अडकून पडली आहेत.
दोन महिन्यांपासून नागरिक हैरान
विशेष म्हणजे जळगाव येथून ही कामे करून आणण्यात अडचणी निर्माण केल्या जातात. अशावेळी जनतेने कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न पडला आहे. येत्या दोन-तीन दिवसात येथील कार्यालयातील कारभारात सुधारणेसह इंटरनेट सेवा सुरु होण्याकामी वरिष्ठांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या दीड महिन्यापासून जमीन मोजणीच्या कागदपत्रांसाठी चकरा मारत आहे. मात्र, इंटरनेट सेवा ठप्प असल्याने काम झाले नाही. जनतेलाही असाच त्रास सहन करावा लागतो आहे. कारभारात त्वरित सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
- ज्ञानेश्वर शिंदे, ओझर, ता. जामनेर