esakal | तिचा फोन ठरला अखेरचा...सकाळची भेटही नशीबी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

sucide

वर्षभरापुर्वी लग्‍न झाले. सुरवातीलचे तीन– चार महिने चांगले आनंदी व सुखात गेले. यानंतर मात्र सासरच्‍या मंडळीनी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. मात्र दिल्‍या घरी सुखी रहा...हा कानमंत्री माहेरच्‍या मंडळींनी देत मुलबाळ झाल्‍यानंतर मुलीचा संसार सुखाचा होईल अशी आशा होती. दरम्‍यान रात्री तिचा फोन आला व पतीने मारहाण केल्‍याचे आईला सांगितले. सकाळी येतो असे सांगितले. पण सकाळची ठरलेली भेटही नशिब राहिली नव्‍हती.

तिचा फोन ठरला अखेरचा...सकाळची भेटही नशीबी नाही

sakal_logo
By
शंकर भामेरे

पहूर (ता. जामनेर) : गोंदेगाव (ता. जामनेर) येथे सासरच्या जाचाला कंटाळून वीस वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

गोंदेगाव येथील शकील भिकन तडवी याच्याशी जांभोळ (ता. जामनेर) येथील रुक्सानाबी हबीब तडवी यांचा मागील वर्षी विवाह झाला. विवाहानंतर दोन-तीन महिने सासरच्यांनी रुक्सानाबी हिस चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर त्यांनी तिला माहेरहून 50 हजार रुपये आणण्याचा तगादा लावला. माहेरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे 50 हजार रुपये ते देऊ शकले नाहीत. मात्र आमच्याकडे पैसे आल्यानंतर आम्ही देऊ असे म्हणून त्यांनी आपल्या मुलीला 'दिल्या घरी सुखी रहा...'असा कानमंत्र दिला. मूलबाळ झाल्यानंतर आपल्या मुलीचा संसार सुखात होईल, असा भाबडा आशावाद त्यांचा होता. दरम्यान रुक्सानाबीचा सासरच्यांकडून वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच होता.

रात्री मुलीचा फोन सकाळी मात्र निरोप
शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रुकसानाबीने आपल्या आईला पतीकडून मारहाण झाल्यचे मोबाईलवरून सांगितले. सकाळी आम्ही येतो असे सांगून माहेरचे लोक रात्री झोपी गेले. मात्र सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास माहेरच्यांनी फोन केला असता रुकसानाबीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी मयत रुकसानाबी तडवीच्या आई शकीला आबुदीन तडवी (रा. जांभोळ) यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात शकील भिकन तडवी (पती), तमीजाबाई भिकन तडवी (सासू), जुबेर भिकन तडवी (जेठ), परवीनबी जुबेर तडवी (जेठाणी) व शरीफ तडवी (मामसासरे, रा . सर्व गोंदगांव) या सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे करीत आहेत. 

पती ताब्‍यात
दरम्यान, पतीने अमानुष मारहाण करून पत्नीचा खून करून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप रुकसानाबीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. सासरच्‍या पाच जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, पती श‍कील तडवी यास पोलिसांनी ताब्‍यात  घेतले आहे .


संपादन : राजेश सोनवणे

loading image