अंगठेबहाद्दरांच्या नावापुढे आल्या कशा सह्या, ग्रामस्थ देखील अंचबित 

सतिष बिऱहाडे
Monday, 7 September 2020

ग्रामस्थांनी अचानक झालेल्या या बदलाबाबत चौकशी, विचारपूस करण्यासाठी मराठेंना घेराव घातला. आपल्याला ग्रामपंचायत प्रशासनाने परवानगीचा ठराव व तसे पत्र लिहून दिले असल्याचे सांगितले.

तोंडापूर (ता. जामनेर) : मांडवे बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या नावाने बनावट सह्या करीत स्वस्त धान्य वाटपाचा परवाना प्राप्त केल्याचा धक्कादायक प्रकार तोंडापूर येथे उघड झाला आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धाव घेत संबंधित दुकानदाराला जाब विचारला. मात्र, संबंधित दुकानदाराने पळ काढला. या प्रकरणी रविवारी (ता. ७) ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायत सचिव, सरपंचांनी विनोद मराठे, ग्रामपंचायत सदस्य अनिल विसावे यांच्याविरुद्धची पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 
मांडवे बुद्रुक येथे स्वस्त दान्य वाटपाचे काम सध्या तोंडापूर येथील संजय निकम दोन वर्षांपासून करीत आहेत. मात्र, यापूर्वी मांडवे खुर्द येथील विनोद मराठे यांना मांडवे बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकान चालविण्यासाठी मिळाले होते. त्यांच्याविरुद्ध तक्रारी आल्यामुळे धान्यवाटपाचा कार्यभार निकम यांच्याकडे आला. दरम्यानच्या काळात तहसीदारांकडे दुकान चालकाविरुद्धचा ग्रामस्थांच्या सह्या असलेला तक्रार अर्ज आला. दाखल केलेल्या तक्रारीत ज्या ग्रामस्थांची नावे व सह्या आहेत, त्या बनावट असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.

ग्रामस्थांनी घातला गोंधळ

ग्रामस्थांनी अचानक झालेल्या या बदलाबाबत चौकशी, विचारपूस करण्यासाठी मराठेंना घेराव घातला. आपल्याला ग्रामपंचायत प्रशासनाने परवानगीचा ठराव व तसे पत्र लिहून दिले असल्याचे सांगितले. या उत्तरावर ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मराठेंनी तहसीलदार यांच्याकडे केलेला संजय निकम यांच्या कामाबाबतचा तक्रार अर्ज दाखविला. अर्जात केलेल्या तक्रारीत ग्रामस्थांची नावे व सह्या पूर्णपणे बोगस असल्याचे निदर्शनास आले. जे निरक्षर ग्रामस्थ आहेत, त्यांच्या नावापुढे देखील सह्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी एकच गोंधळ घातला.

 

दुकानदाराने केले पालयन

जमाव अधिक आक्रमक होत असल्याचे पाहुन मराठेंनी पलायन केले. या बनावट सह्या पाहून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तहसीलदारांनी विनोद मराठे यांना संजय निकम यांच्याविरोधातील बनावट अर्जाबात कोणतीही चौकशी वा शहानिशा न करता अथवा गावातील नागरिकांना पूर्वसूचना न देता या अगोदरही धान्य गैरव्यवहारप्रकरणी तक्रार दाखल असलेल्या तसेच परवाना रद्द केलेल्या विनोद मराठे यांना परवाना दिलाच कसा? याबाबत तहसील कार्यालयातील अधिकारीच तर अप्रत्यक्षपणे सहभागी नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बनावट सह्या करुन मराठे व या कामात मदत करणारे ग्रामपंचायत सदस्य अनिल विसावे यांच्याविरुद्ध पहूर पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner Obtained grain distribution license by forging signatures on the application of uneducated villagers.