महिनाभरापुर्वीच विवाह आणि आई- वडिलांची ती भेट ठरली अखेरची

शंकर भामेरे
Monday, 9 November 2020

खरात यांच्या कुटुंबात यावर्षी गोपालच्या दोन हाताचे चार हात झाले. त्यामुळे मजुरीही वाढणार. संसार सुखात होईल. संसार वेलीवर फुल उमलेल, असे सोनेरी स्वप्न रंगवत नवविवाहित गोपाल सुरेश खरात हेही पत्नीला घेऊन इंदापूरला गेले होते. 

पहूर (ता. जामनेर) : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीच्या कामावर गेलेल्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. जामनेर तालुक्यातील पळसखेडा काकर येथील वीस वर्षीय तरुण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला असून, महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या तरुण्याचा संसार उघड्यावर आल्याने ‘अर्ध्यावरती डाव मोडला...अधुरी एक कहाणी... ' या ओळींचा प्रत्यय संवेदनशील मन हेलावून टाकणारा आहे. 
गावाकडे हाताला काम नाही; म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून पळसखेडा काकर येथील खरात कुटुंब पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ऊसतोडीचे काम करून गुजराण करत होते. याही वर्षी खरात यांचे कुटुंब कबिला असाच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात स्थलांतरित झाला. 

लग्‍न होवून झाला होता महिना
गोपाल सुरेश खरात (वय २०) यांचे नुकतेच महिनाभरापूर्वी लग्न झाले होते. परंतु गावाकडे काम नसल्याने तेही आपल्या आई- वडिलांसोबत पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ऊस तोडीसाठी पत्नीला घेऊन उदरनिर्वाह भागवण्यासाठी गेले. हनुमंत रामचंद्र व्यवहारे यांच्याकडे खरात कुटुंब गेल्या चार वर्षांपासून ऊसतोडीचे काम इमानेइतबारे करत होते. खरात यांच्या कुटुंबात यावर्षी गोपालच्या दोन हाताचे चार हात झाले. त्यामुळे मजुरीही वाढणार. संसार सुखात होईल. संसार वेलीवर फुल उमलेल, असे सोनेरी स्वप्न रंगवत नवविवाहित गोपाल सुरेश खरात हेही पत्नीला घेऊन इंदापूरला गेले होते. 

दोघे राहत होते शेतावर
दरम्यान, गोपाल खरात यांचे आई - वडील इंदापूर येथील शेतावर तर गोपाल खरात आणि त्यांची पत्नी भिगवन (ता. इंदापूर) येथील शेतावर होते. इंदापूर ते भिगवन हे ४० किलोमीटरचे अंतर..आई- वडिलांना भेटावे म्हणून मोटरसायकलद्वारे गोपाल खरात इंदापूर जाण्यासाठी निघाला. आई -वडिलांशी प्रेमाच्या चार गोष्टी झाल्या. आता निघावं म्हणून गोपालने मोटरसायकलला किक मारली आणि भिगवण जाण्यासाठी मार्गस्थ झाला.

ती भेट ठरली अखेरची... 
आई- वडिलांना भेटून गोपाल मोटारसायकलद्वारे भिगवनकडे निघाला होता. पुणे- सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसदेव याठिकाणी गोपाळाची मोटारसायकल येताच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. अशातच आजूबाजूच्या लोकांनी त्याला इंदापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. तातडीचे उपचार सुरू झाले. मात्र, उपचार सुरू असतानाच गोपालची प्राणज्योत मालवली. चार बहिणींच्या एकुलता एक भावाच्या हृदयद्रावक मृत्यूने पळासखेडा काकर, देऊळगाव गुजरी परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई- वडील, १ अविवाहित बहिण, ३ विवाहीत बहिणी असा परिवार आहे.

व्यवहारे यांच्याकडून मदत
माजी सैनिक असलेल्या हनुमंत रामचंद्र व्यवहारे यांनी मृत गोपाळ खरात यांचा मृतदेह गावाकडे म्हणजेच पळसखेडा काकर येथे नेण्यासाठी तजवीज केली. शोकाकुल वातावरणात पळासखेडा काकर येथील स्मशानभूमीत सोमवारी (ता. ९) सकाळी अकराला गोपाळ खरात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत गोपाल खरात यास इन्शुरन्स मिळण्याकामी हनुमंत व्यवहारे प्रयत्नशील असून, गोपालच्या दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner sugar worker death on accident in highway