स्वस्त धान्याचा काळा बाजार; नागरीकांना न देता थेट बाजारात 

सतीश बिऱ्हाडे
Friday, 16 October 2020

तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्याने अखेर गावातील स्वस्त धान्य दुकानदार संजय लोखंडे यांच्या घरातून सहा ते सात पोती गहू, तांदूळ मांडवे येथील दुकानदार विनोद मराठे यांनी एका रिक्षावाल्याला हाताशी धरून हे स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकण्याच्या बेतात होते. 

तोंडापूर (जळगाव) : येथून जवळच असलेल्या खांडवे गावातून शासकीय गहू व तांदूळ घेऊन काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने माल घेऊन जाणारी अॕपेरिक्षा अखेर ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आली. याबाबत तहसीलदारांना कळविण्यात आले. सतत तीन दिवस संबंधित रिक्षातून हा गहू, तांदूळ काळ्या बाजारात विकला जात होता. याची नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित रिक्षा पकडली. 

दोन दिवस अगोदर खांडवे ग्रामस्थांना दिला जाणारा स्वस्त धान्य, तांदूळ, गहू, डाळ हे स्वस्त धान्य वेळेत वाटप होत नसल्याच्या तक्रारी जामनेर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्याने अखेर गावातील स्वस्त धान्य दुकानदार संजय लोखंडे यांच्या घरातून सहा ते सात पोती गहू, तांदूळ मांडवे येथील दुकानदार विनोद मराठे यांनी एका रिक्षावाल्याला हाताशी धरून हे स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकण्याच्या बेतात होते. 

तहसिलदारांना दिली माहिती अन्‌
गावाजवळील बसस्थानकाजवळ संशयास्पद रिक्षा थांबवत ही माहिती ग्रामस्थांनी जामनेर तहसीलदारांना दिली. याची तत्काळ दखल घेण्यात आल्याने झालेला प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळवून पुरवठा निरीक्षक विठ्ठल काकडे यांनी खांडवे येथे चौकशीसाठी संबंधित रिक्षा व धान्याचा पंचनामा केला. अॕपेरिक्षासह धान्य पहूर पोलिसांत जप्त करून पुरवठा निरीक्षक काकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या 
संबंधित रिक्षाचालकास अटक करण्यात आली. दुकानदार विनोद मराठे फरारी असल्याचे पोलिससूत्रांनी सांगितले. विनोद मराठे याने मांडवे बुद्रुक ग्रामस्थांच्या खोट्या सह्या करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा काळा बाजार केल्याचा आरोप होत आहे. मांडवे बुद्रुक येथील सप्टेंबरचे धान्य वितरित करून उर्वरित तिन्ही गावांमध्ये धान्याचे वाटप न करता त्याची परस्पर विक्री केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner swast dhanya black market officer arrested