esakal | त्‍यांच्या जाण्याने अर्ध्यावर डाव मोडला...स्‍वप्न राहिले अपुर्णच
sakal

बोलून बातमी शोधा

accident

विहिरींना आडवे बोअर करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. यंदा दोघांनी पहिल्यांदाच कपाशीची लागवड आपल्या गावी केली होती. कपाशी लागवडीचा त्यांना अनुभव नव्हता. त्यामुळे चाळीसगाव येथे कपाशीवर फवारणीसाठी औषध घेण्यासाठी ते खडकीमार्गे चाळीसगावकडे येत होते.

त्‍यांच्या जाण्याने अर्ध्यावर डाव मोडला...स्‍वप्न राहिले अपुर्णच

sakal_logo
By
दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : दरेगावकडून देवघटकडे जाणाऱ्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दरेगाव (ता.चाळीसगाव) येथून दोन किलोमीटरवर घडली. दोघेही मृत लेंढाणे (ता. मालेगाव) येथील रहिवासी आहेत. अज्ञात कार चालकाविरोधात मेहूणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लेंढाणे (ता. मालेगाव) येथील हिरामण पुंजाराम अहिरे (वय ५४) व बाळू भिला जगताप (वय ४९) हे शेतीकामाबरोबरच विहिरीचे आडवे बोरींगचेही कामे करतात. आज (ता.३१) सकाळी साडेसातच्या सुमारास लोंढाणे येथून खडकीसीम येथे कपाशीवर फवारणीसाठी औषध घेण्यासाठी (एमएच. ४१ झेड. ४६३९) या दुचाकीने जाताना दरेगावपासून दोन किमी अंतरावर पाटचारीच्या मोरीजवळ दरेगावकडून देवघटकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच. १५ बीएन. ४२२८) या कारने समोरून जोरदार धडक दिली. त्यात दोघेही दरेगाव रस्त्यावर पाटाच्या मोरीवर जाऊन आदळले. त्यात जबर मार लागल्याने हिरामण अहिरे व बाळू जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. 

धडक देवुन कारचालक फरार 
दुचाकीला धडक देवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकाने अपघाताची माहिती न देता कारसह पळ काढला. त्यावेळी दुचाकीच्या मागे काही अंतरावर असलेले संभाजी मगर यांनी कारचा नंबर लक्षात ठेवून तिचा पाठलाग केला परंतु भरधाव कार काही क्षणात दिसेनाशी झाली. अपघात माहिती कळताच ग्रामस्‍थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. 

अर्ध्यावर डाव मोडला 
कारच्या भीषण अपघातात ठार झालेले लेंढाणे येथील हिरामण अहिरे व बाळू जगताप या दोघांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. विहिरींना आडवे बोअर करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. यंदा दोघांनी पहिल्यांदाच कपाशीची लागवड आपल्या गावी केली होती. कपाशी लागवडीचा त्यांना अनुभव नव्हता. त्यामुळे चाळीसगाव येथे कपाशीवर फवारणीसाठी औषध घेण्यासाठी ते खडकीमार्गे चाळीसगावकडे येत होते. खडकी येथे त्यांचे नातेवाईक असल्याने त्यांना बरोबर घेऊन चाळीसगावकडे येण्याचा बेत होता. मात्र त्यापूर्वीच दोघांवर काळाने झडप घातली. दोघांच्या मृत्यूने त्यांचा संसार उघड्यावर पडला असून अर्ध्यावर डाव मोडला आहे. 
 

संपादन : राजेश सोनवणे

loading image