कोरोनात कांद्याने केला वांदा, शेतकरी संकटात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

चाळीसगाव तालुक्यात यावर्षी १ हजार ६०० हेक्टरवर उन्हाळी काद्यांची लागवड करण्यात आली होती. ही लागवड मागील वर्षापेक्षा ४०० हेक्टरने वाढली असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सध्या कोरोनाचे संकट घोंघावत असताना त्याचा फटका या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. चाळीसगाव तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी भाव नसल्याने मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यावर्षी उन्हाळी कांद्यांचे चांगले उत्पादन झाले. मात्र, अपेक्षित भाव नसल्याने कांदा चाळीत भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे कांदा उत्पादक आता दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहे. कोरोनामुळे कांद्याने वांधा केला असून शासनाने या संदर्भात ठोस धोरण ठरवावे, अशी मागणी होत आहे. 
चाळीसगाव तालुक्यात यावर्षी १ हजार ६०० हेक्टरवर उन्हाळी काद्यांची लागवड करण्यात आली होती. ही लागवड मागील वर्षापेक्षा ४०० हेक्टरने वाढली असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली. तालुक्याचे एकूण क्षेत्र ९५ हजार हेक्टर असून त्यात ऊस, मका, केळी आदी पिके घेतली जातात. तालुक्यात कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा कांद्याची रोपे तयार करण्यापासून ते लागवड करण्यावर खूप मोठा खर्च झालेला आहे. मागीलवर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने उन्हाळी कांदा लागवड देखील वाढली होती. आता काही शेतकरी कांदा काढून चाळीत भरण्याची लगबग करीत आहेत. काहींना ठेवण्यासाठी साधन नसल्याने बाजारात जो भाव मिळेल, त्या भावात कांदा विकताना दिसत आहेत. 

काद्यांला हमी भाव द्यावा 

राज्य शासनाने कांद्यांना हमी भाव द्यावा, अशी मागणी सातत्याने होत असून या संदर्भात शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सध्या ६०० पासून ८०० रुपये क्विंटलपर्यंत कांद्यांना भाव मिळत असला तरी झालेला खर्च पाहता, हा भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी हातबल झाले आहेत. अशातच शासनाच्या विविध योजनांची माहिती सध्या गाव पातळीवर पोहचत नसल्याने तालुका कृषी विभागासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ‘माय जेवू देई ना, अन बाप भीक मागू देई ना’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कांद्याला शासनाने हमी भाव देण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

खर्चही निघणार नाही 
कांदा लागवडीसाठी मशागत, रोपे खरेदी खते, पाणी, मजुरी, वाहतूक, गोण्यांचा खर्च, आडत, हमाली असा सर्व एकूण मोठा खर्च शेतकऱ्यांचा झालेला आहे. अनेकांनी सतत सहा महिने शेतात राबून काद्यांची काळजी घेऊन चांगले पीक घेतले. मात्र, आज मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. कांद्यांच्या उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बाजारात जाऊन कांदा विकणे कठीण बनले आहे. झालेला खर्च व मिळणारा भाव पाहता, काद्यांने वांदा केल्याचे दिसत आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. 

वाढत्या तापमानाचा कांद्यांवर दुष्परिणाम 
सुमारे पंधरा दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. अशा वातावरणात कांदा चाळीतच सडण्याची शक्‍यता असल्याने बहुतांश शेतकरी कांदा चाळीत न ठेवता तो बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे केलेले लॉकडाऊन यामुळे शेतकरी वैतागला आहे. मागीलवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांची कांद्यांमुळे चांदी झाली होती. काहींना उन्हाचा तडाखा बसल्याने त्यांचा कांदा चाळीतच सडला होता. आता मात्र पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये यासाठी शेतकरी बाजारात जो भाव मिळेल, त्या भावात कांदा विकून 
मोकळे होत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news onion farmers in crisis