महाजन म्‍हणतात..मी सांगेल तोच आकडा फिट

सी. एन. चौधरी
Sunday, 15 November 2020

महाजनांनी सरकारचा समाचार घेत शिवसेना, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस यांचेसह नुकतेच भाजपात प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचे नाव न घेता बोचरी टिका केली.

पाचोरा (जळगाव) : गेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे संदर्भात झालेली चूक मी मान्य करतो. परंतु पुढील काळात पाचोरा तालुका भाजपाच्या सत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल. अमोल शिंदे हेच आमदार असतील. कारण माझा शब्द मी खरा करतो व मी सांगितलेला आकडा ही फिट असतो; असे माजी मंत्री गिरीश महाजन आज एका कार्यक्रमात म्‍हणाले.
पाचोरा येथे अटल भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे अध्यक्षस्थानी होते. प्रथम भडगाव येथील कार्यालयाचे उद्घाटन करून ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पाचोरा येथे भडगाव रोड भागातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील सतीश शिंदे यांच्या व्यापारी संकुलातील कार्यालयाचे उद्घाटन झाले. तेथेच जाहीर सभा झाली. याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील, विधान परिषदेचे आमदार चंदू पटेल, आमदार मंगेश चव्हाण, अमोल शिंदे, अमोल पाटील (भडगाव), डी. एम. पाटील, सदाशिव पाटील ,रमेश वाणी, माजी सभापती बन्सीलाल पाटील, पोपट तात्या भोळे, नगराध्यक्ष करण पवार (पारोळा), जि प सदस्य मधुकर काटे, सभापती वसंत गायकवाड आदी उपस्थित होते. 

राऊतांनी चापलूसी थांबवावी
राज्यात पहिल्यांदाच निष्क्रिय व बेजबाबदार सरकार सत्तेवर आले आहे. तीन पक्ष्यांचे हे सरकार असल्याने त्याचा मालक कोण? हे त्यांनाही सांगता येणार नाही. या रामभरोसे सरकारला काहीच देणे घेणे नाही. त्याचे फळ त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मिळेल. सर्व प्रकरणाचे स्पष्टीकरण करण्याचा ठेका राऊतांनी घेतलेला आहे. त्यांनी चापलूसी थांबवावी. असे आरोपात्मक प्रतिपादन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

खडसेंनाही लगावला टोला
आपल्या मनोगतात महाजनांनी सरकारचा समाचार घेत शिवसेना, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस यांचेसह नुकतेच भाजपात प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचे नाव न घेता बोचरी टिका केली. ते म्‍हणाले, की पाठीत खंजीर खुपसण्याची आमची संस्कृती नाही. ज्यांची ती संस्कृती आहे; तेच तशी भाषा करतात. तसेच भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून तो विचारावर चालणारा पक्ष आहे. मी गेलो म्हणून संपले असे होत नाही. जाणारे जातात पण कुणाच्या जाण्याने काहीच संपत नाही; असा चिमटा खडसे यांचे नाव न घेता त्यांनी काढला.

शिवसैनिकांनी बाळासाहेबांची सेना आठवावी
राज्याचे प्रमुख व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री घरातून बाहेर निघायला तयार नाहीत. भाषणे देऊन व ऑनलाइन संवाद साधून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. सोनिया मातेची शपथ घेणाऱ्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांची सेना आठवावी. आपण काय बोलतो व काय करतो याचे भान ठेवावे. सध्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात संजय राऊत यांची चापलूसी चालते त्यांनी ती थांबवावी. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora bjp office opning and girish mahajan target state goverment