बंद जनावरांचा बाजारामूळे कोट्यावधीचाी उलाढाल ठप्प 

किशोर पाटील 
Wednesday, 9 September 2020

लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपूर्वी विकत घेतलेली जनावरे अजूनही विकता आलेली नाहीत. त्यांना चारा, पाणी करणे अवघड झाले आहे.

वावडे (ता. अमळनेर) : जनावरांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे संसार देशोधडीला लागले आहेत, तर जनावरांचे बाजार बंद असल्याने छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेला बाजार लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. 

अमळनेर बाजार समितीच्या आवारात दर सोमवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो. बाजारात लाखोंची उलाढाल होते. मार्चमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे आठवडेबाजार व जनावरांचा बाजार बंद करण्यात आला. अमळनेर परिसरात दोनशेपेक्षा अधिक जनावरांचे व्यापारी आहेत. त्यातील अनेक व्यापारी रक्कम गुंतवणूक करून जनावरांची खरेदी करतात व जादा किंमत मिळताच विकतात. नेहमी जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांत खरेदी केलेली जनावरे विकली जातात. त्यामुळे खरेदी केलेली जनावरे जास्त दिवस सांभाळावी लागत नाहीत. मात्र, लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपूर्वी विकत घेतलेली जनावरे अजूनही विकता आलेली नाहीत. त्यांना चारा, पाणी करणे अवघड झाले आहे.

शिवाय उलाढाल नसलेल्या व्यापाऱ्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. काही व्यापाऱ्यांनी उपजीविकेसाठी बांधकाम करणाऱ्यांच्या (सेंट्रिंग) हाताखाली, तर काहींनी चालक म्हणून, तर काहींनी मोलमजुरी सुरू केली आहे. बंदमुळे मोठे व्यापारही नेस्तनाबूद झाले असून, त्यांच्या हाताखालील कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांकडून जनावरांचा बाजार सुरू करावा, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागात अनेक छोट्या शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बोकड, कोंबड्या असतात. पैशांची गरज भासते, तेव्हा बाजारात विकली जातात. मात्र, बाजार बंद असल्याने जनावरे विकता येईनात. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. 

 
परवानगी दिल्यास कोरोनाबाबतची सर्व काळजी घेऊन बाजार सुरू करण्यास तयार आहे. व्यापारी व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन बाजार सुरू केले जावेत. 
- प्रफुल्ल पवार, सभापती, बाजार समिती, अमळनेर 

माझ्यावर कुटुंबासह माझ्याकडे असणाऱ्या कामगारांची कुटुंबे अवलंबून आहेत. माझ्याच उदरनिर्वाहाचा प्रश्‍न असून, कामगारांचे काय करायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाने व्यापाऱ्यांचा अंत पाहू नये. जनावरांचा बाजार सुरू करावा. 
- प्रकाश पाटील, व्यापारी, अमळनेर 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora corona caused the cattle market to close, bringing the turnover to billions