खानदेशची जैविक पपईचा गोडवा दिल्लीकरांना भावला

चंद्रकांत चौधरी
Tuesday, 24 November 2020

आईसबेरी व तैवान हे वाण शेतीत लावून त्यांना प्रथम शेणखत व पंधरा दिवसांनी जैविक लिक्विड देऊन सुयोग्य व्यवस्थापन केले.

पाचोराः खानदेशातील विविधांगी खाद्यपदार्थां सोबतच केळी सह विविध फळांना देशासह देशाबाहेर खवय्यांची मागणी दिवसागणिक वाढत असून आता खानदेशातील अंतुर्ली खुर्द (ता पाचोरा) येथील जैवीक उत्पादनाची पपई राजधानीत धडकली असून या पपईचा गोडवा दिल्लीकरांना चांगलाच भावला आहे. शेतकऱ्यांनी शेतीत विविधांगी प्रयोग करून शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्याचा आदर्श या पपई उत्पादनाने घालून दिला आहे.

आवश्य वाचा- धागा धागा जोडत लावला ‘लेफ्टनंट’चा स्‍टार 

अंतुर्ली खुर्द (ता पाचोरा )येथील संजीव पाटील यांनी अडीच एकर शेती क्षेत्रात पपईची लागवड करून जैविक पद्धतीने उत्पादन काढून ते व्यापाऱ्यांमार्फत दिल्लीपर्यंत पोहोचवले आहे. मुरबाड जमीन, दुष्काळी स्थिती, बेमोसमी पाऊस, वाढती रोगराई व सततचे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना दिवसेंदिवस वाढत आहे. तेच तेच उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याने शेत जमिनीची उत्पादन क्षमता ही कमी होत असल्याने शेतकऱ्यांची विवंचना वाढत आहे. संजीव पाटील यांनी मात्र शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी असलेल्या गायी व म्हशीचे शेण त्यांनी आपल्या शेतात जैविक उत्पादनासाठी वापरले.

 

जैविक पपईचा गोडवा

अडीच एकर क्षेत्रात त्यांनी आठ बाय सहा आकाराचे वाफे करून 2 हजार पपईची झाडे लावली व त्यास ठिबक सिंचन केले. आईसबेरी व तैवान हे वाण शेतीत लावून त्यांना प्रथम शेणखत व पंधरा दिवसांनी जैविक लिक्विड देऊन सुयोग्य व्यवस्थापन केले. त्यामुळे पपईचे झाड सुमारे बारा फुटापर्यंत वाढले असून झाडाच्या बुंध्यापासून अवघ्या दीड फुटाच्या अंतरापासून झाडाला पपया लागल्या आहेत. 83 क्विंटलचा पहिला तोडा करून 1 हजार 50 रुपये प्रतिक्विंटल भाव त्यांनी मिळवला व फळ व्यापाऱ्याने ही पपई दिल्लीच्या बाजारपेठेत नेली. जैविक उत्पादनाची पपई असल्याने तिचा रंग आणि गोडवा दिल्‍लीकरांना चांगलाच भावला. त्यातून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवले. जैविक फळांमुळे प्रतिकार शक्ती वाढत असल्याने ग्राहकांनी या पपईस पसंती दिली आहे.

हेही वाचा- विवाह जमविण्याचा नादात फसवणूक करणारी टोळी गजाआड -

पिकाला तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची जोड
शेतकऱ्यांनी तेच ते पीक घेण्याच्या मागे न लागता पारंपारिकतेला नवीन तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची जोड देऊन कमी खर्चात व कमी पाण्यात लाखो रुपयांचे उत्पादन काढण्यासाठी प्रयत्नशील व्हावे .जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करून त्या जनावरांच्या शेणाचा वापर खत म्हणून आपल्या शेत शिवारात करावा असे आवाहन संजीव पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांना केले आहे.

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora Delhiies love Khandesh's organic papaya