आत्महत्याग्रस्त शेतकरी वारसांसाठी 'उभारी'; रोजगार अन्‌ महिलांना व्यवसाय साहित्य 

चंद्रकांत चौधरी
Thursday, 26 November 2020

खरीप व रब्बी हंगामाचे अतिवृष्टी अथवा पावसाअभावी होणारे नुकसान, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे हताश होऊन शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची प्रचंड वाताहत होते.

पाचोरा (जळगाव) : पाचोरा व भडगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जगण्याची 'उभारी' देण्यात आली असून, महसूल विभागाचे अधिकारी व परिसरातील उद्योजक यांच्या योगदानातून हा उपक्रम यशस्वी करण्यात येत आहे. या उपक्रमाचे व योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 
खरीप व रब्बी हंगामाचे अतिवृष्टी अथवा पावसाअभावी होणारे नुकसान, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे हताश होऊन शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची प्रचंड वाताहत होते. त्यांना जीवन जगणे देखील अशक्य होते. एकूणच या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी वारसांना जीवन जगण्यासाठी सिद्ध करणे, त्यांना जगण्याची 'उभारी' देणे व त्यांना मूळ प्रवाहात आणणे या उद्देशाने ‘उभारी’ योजना सुरू केली. 

अधिकाऱ्यांनी घेतली जबाबदारी
योजनेंतर्गत पाचोरा महसूल उपविभागातील पाचोरा व भडगाव तालुक्यात प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या नेतृत्वाखाली उभारी योजना यशस्वी केली जात असून, २०१५ ते २०२० दरम्यानच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात पाचोरा तालुक्यातील २५ व भडगाव तालुक्यातील १९ अशा ४४ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांची जबाबदारी २२ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांना जगण्याची उभारी देण्यासाठी विविधांगी उपायोजना केल्या जात आहेत. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, माधुरी आंधळे, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे. 

मदत अन्‌ नोकरी केली उपलब्‍ध
शासनाच्या योजनांसह परिसरातील उद्योजकांच्या सहकार्याने वारसांना साहित्य उपलब्धी व रोजगार मिळवून दिला जात आहे. आतापर्यंत २० वारसांना घरकुल योजनेचा व ११ वारसांना शौचालय योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. तसेच निर्मल उद्योग समूह, गजानन उद्योग समूह, आशीर्वाद इन्फ्रा, विघ्नहर्ता फाउंडेशन, सुपर शॉपी या उद्योजकांच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १० वारसांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिला वारसांना पिको फॉल मशीन तसेच घरगुती पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्मल उद्योग समूहाच्या वतीने रब्बी हंगामासाठी ज्वारी, बाजरी, भाजीपाला यांची बियाणे मोफत देण्यात आली असून आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते त्याचे वाटप करण्यात आले. 

उद्योजक, दानशुरांची मदत 
शासनाच्या विविधांगी योजनां सोबतच पाचोरा व भडगाव तालुक्यातील उद्योजक, कारखानदार व दानशूर यांची मदत घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जगण्याची खऱ्या अर्थाने ‘उभारी’ मिळत असल्याने अधिकारी व उद्योजकांचे कौतुक होत आहे. 

पाचोरा व भडगाव तालुक्यातील ४४ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांची जबाबदारी २२ अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे. त्यांना शासकीय योजनांसह उद्योग व्यवसायासाठी साहित्याचे वाटप व विविध ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. 
- राजेंद्र कचरे, प्रांताधिकारी, पाचोरा  

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora farmer suicide family member help in ngo and officer