जुगाड टेक्‍नॉलॉजी...मोटर सायकलची केली तिफण 

सी. एन. चौधरी
शनिवार, 11 जुलै 2020

प्रथम वखरणीसाठी या प्रयोगाचा वापर केला. एकरी एक लीटर पेट्रोलचा खर्च त्यांना त्यासाठी लागला. त्यांनी मोटारसायकलीला लोखंडाचा पाईप जोडून त्याला वखर, कोळपे यांची जोडणी करून वखरणी व कोळपणी यशस्वी केली आहे.

पाचोरा (जळगाव) : ‘गरज ही शोधाची जननी असते’ या उक्तीची साक्ष अनेकदा विविधांगी घटनांवरून अनुभवायला मिळते. एखाद्या अडचणीवर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, तर त्यात यश मिळते याची अनुभूती खडकदेवळा खुर्द (ता. पाचोरा) येथील तरुण शेतकरी गजानन मंगरुळे यांच्या जुगाड टेक्‍नॉलॉजीवरून आली. त्यांनी शेतीच्या अंतर मशागतीसाठी केलेली मोटर सायकलची तिफन सध्या तालुक्यात चर्चेचा व औत्सुक्याचा विषय बनली आहे. 

शेती व्यवसाय दिवसागणिक विविध कारणांमुळे संकटात येत आहे. पावसाचा लहरीपणा, दुष्काळ, मजुरांची चणचण, वाढती मजुरी, बैल जोडीचा खर्च न परवडणे रोगराईचा प्रादुर्भाव, विजेचा लपंडाव, शेतीमालाला हमीभाव न मिळणे व नुकसान भरपाईची केवळ आश्वासने अशा एक ना अनेक समस्यांमध्ये बळीराजा गुरफटला असून खरीप व रब्बी उत्पादनासाठी खंबीरपणे उभे राहणे देखील शेतकऱ्यांना अशक्य होत असल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहेत. 

 

प्रथम केली वखरणी 

गजानन मंगरूळे यांनी प्रथम वखरणीसाठी या प्रयोगाचा वापर केला. एकरी एक लीटर पेट्रोलचा खर्च त्यांना त्यासाठी लागला. त्यांनी मोटारसायकलीला लोखंडाचा पाईप जोडून त्याला वखर, कोळपे यांची जोडणी करून वखरणी व कोळपणी यशस्वी केली आहे. यामुळे खर्चही कमी येतो. पाच एकर शेतीचे क्षेत्र वखरणीसाठी बैल जोडीला एक दिवस लागतो, परंतु मोटार सायकलच्या माध्यमातून हे काम अवघ्या चार- पाच तासात पूर्ण होते. मोटार सायकलला मागे वखर, पास, रुमणे, कोळपे, काठी या साहित्याची जोडणी करून त्याआधारे चांगल्या पद्धतीने मशागत करण्याचा प्रयोग मंगरुळे यांनी यशस्वी केला आहे. 
 
शेतकऱ्यांमध्ये उत्‍सूकता 
मंगरुळे यांची मोटर सायकलला शेती अवजारांची जोडणी पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना उत्सुकता लागली असून अनेकांकडून त्याची पाहणी करून तसा प्रयोग करणे अनेकांनी सुरू केले आहे. बैलजोडी बाळगणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने तसेच सामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा खर्चही झेपत नसल्याने मोटरसायकलच्या साहाय्याने शेतीच्या आंतरमशागतीची कामे लवकर व स्वस्तात होतात असा दावा मंगरुळे यांनी केला आहे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora jugad tecnology farmer create motor bike thifan