ओला दुष्काळ जाहीर करा; आमदार पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

चंद्रकांत चौधरी
Thursday, 24 September 2020

ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते केले आहे. पोटच्या पोराप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकांची जोपासना केली; परंतु पावसाने पिकांसह साऱ्या स्वप्नांवर पाणी फिरविले आहे.

पाचोरा ः पाचोरा व भडगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा व न्याय द्यावा, असे आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की पाचोरा व भडगाव तालुक्यांत ऑगस्टअखेरपासून पावसाचे थैमान घातले आहे. या दोन्ही तालुक्यांत कपाशी हे प्रमुख पीक घेतले जाते; परंतु या पांढऱ्या सोन्याचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन, मूग, उडीद ,चवळी, ज्वारी, बाजरी या खरीप हंगामातील पिकांची प्रचंड नासधूस झाली असून, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. लिंबू, मोसंबी, केळी या फळबागादेखील वादळी पावसामुळे उद्‍ध्वस्त झाल्या आहेत. जगावे की मरावे? अशा विवंचनेत शेतकरी असून, गेल्या चार-पाच वर्षांपासून दुष्काळ व नुकसानीचे सातत्य कायम असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे. 

प्रचंड कर्ज काढून यावर्षी शेतकऱ्याने खरिपाची तयारी केली. पहिले दोन महिने पिकेही चांगली होती; परंतु ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते केले आहे. पोटच्या पोराप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकांची जोपासना केली; परंतु पावसाने पिकांसह साऱ्या स्वप्नांवर पाणी फिरविले आहे. संसार कसा करावा? डोक्यावर असलेले कर्ज फेडावे कसे? पुढील हंगामाची तयारी करावी कशी? कर्ज व पैसा मागावा तरी कुणाकडे? घरातील उपवर मुला-मुलींचे विवाह करावे कसे? अशा चक्रव्यूहात शेतकरी अडकले असून, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पाचोरा व भडगाव हे तालुके ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय व दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora MLA Kishor Patil gave a statement to the Chief Minister regarding declaring wet drought