एकाच दिवशी घडल्या दोन घटना; आणि संपूर्ण गाव झाले सुन्न  !

चंद्रकांत चौधरी
Thursday, 10 September 2020

शेतात गेले काही वेळ थांबले व दोघी सुनांना लवकर घरी या पाऊस येण्याची शक्यता आहे असे सांगून घरी परतले. परंतु अंधार पडला तरी दोघी सुना घरी न परतल्याने त्यांनी आपल्या मुलां सह शेतात जाऊन त्यांचा शोध घेतल्या परंतु सुना दिसल्या नाहीत.

पाचोरा ः पाचोरा ते लोहारा दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या शेतीनिष्ठ अशा लहानशा परंतु आदर्श गावात जेठाणी व दिराणीचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळला तर दोघा सख्ख्या भावांनी विष प्राशन केले त्यात एकाचा मृत्यू झाल्याने व दुसरा भाऊ उपचार घेत असल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या गावास भेट देऊन दोन्ही घटनांचा सखोल तपास सुरू केला आहे.

आवश्य वाचा ः गांव तसे चांगल पण समस्यांनी वांगल, काय आहे कारण, वाचा !
 

म्हसास शिवारात गट क्रमांक 90 मध्ये मांगो पाटील यांची शेती आहे. मंगळवार ता 8 रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांची मोठी सून कविता संजय पाटील ( वय 32) लहान सून चंद्रकला गजानन पाटील (वय 27) या शेतात निंदणीचे काम करण्यासाठी गेल्या. तर मांगो पाटील हे आपल्या मुलासोबत जामनेर येथे दवाखान्याच्या कामासाठी गेले. त्यांची पत्नी व एक मुलगा घरीच कविता व चंद्रकला यांची मुले सांभाळत होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास मांगो पाटील जामनेर हुन परतल्यानंतर ते शेतात गेले काही वेळ थांबले व दोघी सुनांना लवकर घरी या पाऊस येण्याची शक्यता आहे असे सांगून घरी परतले. परंतु अंधार पडला तरी दोघी सुना घरी न परतल्याने त्यांनी आपल्या मुलां सह शेतात जाऊन त्यांचा शोध घेतल्या परंतु सुना दिसल्या नाहीत.

विहिरीत चपला तरंगतांना दिसल्या 

पाटील यांना शेतातील जुन्या विहिरीच्या पाण्यावर मात्र चपला तरंगताना दिसल्या. विहिरीला प्रचंड पाणी असल्याने व अंधारामुळे त्यांनी रात्री विहिरीत उतरून शोध घेतला नाही .बुधवार ता 9 रोजी सकाळी कुऱ्हाड (ता पाचोरा) येथील पट्टीच्या पोहणार्‍यांना पाचारण करून विहिरीत शोध घेतला असता दोन्ही सुनांचे मृतदेह हाती लागले. ही घटना गावात समजताच एकच खळबळ उडाली. पोलीस पाटील उज्वला पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना घटना कळवल्यानंतर पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे ,एपीआय नीता कायटे यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणून डॉ अमीत साळुंखे यांनी शव विच्छेदन केले .दोघांवर सायंकाळी एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघी विहिरीत पाय घसरून पडल्या की त्यांनी आत्महत्या केली, हे कोडे पोलिसांपुढे आहे. 

दोघा भावांनी घेतले विष
ता 9 रोजी या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत असतानाच येथील सतीश श्रावण पाटील (वय 40) व दीपक श्रावण पाटील (वय 29) या दोघा भावांनी शेतात विष प्राशन केले. त्यात सतीश पाटील यांचा मृत्यू झाला. दिपकला तात्काळ पाळधी ( ता. जामनेर) येथील रुग्णालयात दाखल केल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मयत सतीश पाटील यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. एकाच दिवशी घडलेल्या दोन वेगवेगळ्या व विचित्र घटनांमुळे संपूर्ण गाव सुन्न झाले आहे .

अजाण बालके पोरकी
मृत कल्पना पाटील हिला अनुक्रमे तेरा व दहा वर्षांच्या दोन मुली व आठ वर्षांचा मुलगा तर चंद्रकला हीस दोन वर्षांची मुलगी असून ती सहा महिन्यांची गर्भवती आहे.

सर्वंकष तपास होणार 
पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी म्हसास गावास प्रत्यक्ष दोन तीन वेळा भेट देऊन या दोन्ही घटनां संदर्भात सखोल तपास सुरू केला आहे .तसेच मांगो पाटील यांच्या शेतातील ज्या विहिरीत दोघांचे मृतदेह आढळले त्या विहीरीची पाहणी केली आहे. ही विहीर निसटती असल्याने पाणी घेण्यासाठी गेलेल्या एकीचा पाय घसरला असावा व तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही विहिरीत पडली असावी असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर याच गावातील दोन्ही भावांच्या विषप्राशन करण्यामागील कारणांचाही कसून शोध घेत असल्याचे कातकडे यांनी सांगितले.
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora Mourning spread in the village due to two incidents on the same day