
पाचोरा ः अलीकडच्या स्वार्थी, स्वयंकेंद्री व धावपळीच्या युगात माणुसकी लोप पावत असल्याचे आपण पाहतो व अनुभवतो देखील. मात्र, अजूनही काही प्रमाणात का असेना सामाजिक संवेदना, बांधीलकी व मानवता शिल्लक असल्याने पापपुण्याचा समतोल साधला जात असल्याचे दिसते. अशाच मानवतेची प्रचिती पाचोरावासीयांना अनुभवायला मिळाली.
मध्य रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झालेले मुरलीधर सोनवणे (वय80 ) हे सध्या पिंप्राळा (ता. जळगाव) येथील दांडेकर नगरात एकटेच वास्तव्यास आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. दोन्ही मुले मुंबईकडे नोकरीला असून मुलीही त्यांच्या संसारात रमल्या आहेत. टाकळी प्र. चा. (ता. चाळीसगाव) येथील मंदाकिनी चव्हाण ही त्यांची मुलगी शिक्षिका असून तिच्याकडे मुरलीधर सोनवणे यांचे नेहमी जाणे येणे व्हायचे व बराच काळ ते वास्तव्याला देखील असायचे. काही दिवसांपासून ते आपल्या मुलीकडे टाकळी येथे आलेले होते. सोमवारी ( 22 जून) सकाळी मी मंदिरात दर्शनासाठी जाऊन येतो, असे सांगून ते निघाले. मंदाकिनी चव्हाणही शाळेत निघून गेल्या. प्रवासी वाहतूक बंद असल्याने मुरलीधर सोनवणे एका ट्रकने पाचोऱ्यापर्यंत आले.
राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलाजवळच्या तारखेडा फाट्यावर ते ट्रकमधून उतरले. प्रवासाचा थकवा आल्याने रस्त्याच्या कडेला आपल्यासोबत असलेली पिशवी डोक्याखाली घेऊन ते लेटले असता, त्यांना झोप लागली. यावेळी तारखेडा (ता. पाचोरा) येथील तुषार मोराणकर हा युवक आपल्या वडिलांसह दुचाकीने तारखेडा येथे जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या सोनवणेंजवळ थांबला. त्याने त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करून विचारपूस केली. मात्र, ते बोलत नसल्याने तुषारने त्यांच्या डोक्याखाली असलेल्या पिशवीला हात लावून त्यात ओळख पटण्या इतपत कागदपत्रे आहेत की नाही या विचाराने पिशवीला हात लावला असता, श्री. सोनवणे भानावर आले. त्यावरून पिशवीत किमती वस्तू असाव्यात असे तुषार मोराणकर यांच्या मनात आले. त्यांनी या वृद्धाबाबत पोलिसांना कळवले. सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, पोलीस हवालदार दीपक सुरवाडे, दामोदर सोनार हे बबलू मराठे याच्या रुग्णवाहिकेसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर वृद्धास पाचोरा पोलीस ठाण्यात आणून त्यांची ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली व त्यांची विचारपूस केली असता, त्याची कहाणी ऐकून पोलिसही चक्रावले. या वृद्धांच्या पिशवीत 5 लाख रुपयांची रोकड व मयत झालेल्या पत्नीचे 25 तोळे सोन्याचे दागिने होते.
दोन्ही मुले मुंबईला राहतात त्यांना माझ्या आयुष्याची ही जमापुंजी व त्यांच्या मृत आईचे दागिने वाटप करायचे आहेत, असे रडत रडत त्यांनी पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलीसही भावनिक झाले. "आम्ही तुम्हाला ओळखत नाहीत', असे मुले म्हणतात. मग त्यांच्या घरी जायचे कसे? असेही या वृद्धाने स्पष्ट केले. त्यांच्या बोलण्यात चाळीसगावचा उल्लेख झाल्याने पोलीस हवालदार राहुल सोनवणे यांनी चाळीसगाव बस आगारात चालक असलेले सुनील मराठे यांच्याशी संपर्क साधून वृद्धासंदर्भात माहिती दिली. सुदैवाने बस चालक मराठे यांनी या वृद्धास ओळखत असल्याने सांगून पोलिसांना मंदाकिनी चव्हाण यांचा मोबाईल क्रमांक दिला. त्यावर संपर्क साधून त्यांना पाचोरा येथे बोलावण्यात आले. वृद्धाची मुलगी पाचोरा पोलीस ठाण्यात आल्यावर तिला आपल्या वडिलांना पाहून रडू आले. पोलिस निरीक्षक
अनिल शिंदे, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, गणेश चोभे, विकास पाटील यांनी त्या वृद्धाजवळ असलेली पाच लाखांची रोकड व पंचवीस तोळे सोन्याचे दागिने त्यांच्या मुलीकडे सोपवले व त्यांना टाकळीकडे मार्गस्थ केले. तारखेडा येथील तुषारने रस्त्यावर पडलेल्या या वृद्धाची चौकशी केली नसती व पोलिसांना कळवले नसते तर कदाचित त्यांच्या जवळचा लाखो रुपयांचा ऐवज कोणीतरी पळवला असता किंवा एखादी अघटीत घटनाही घडली असती. मात्र, तुषार मोराणकर, बस चालक मराठे व पोलिसांच्या सजगतेमुळे लाखो रुपयांच्या ऐवजासह वृद्ध पित्याला मुलीच्या ताब्यात देण्यास पोलीस यशस्वी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.