
व्यवसायातून अनेक कुटुंबांचा चरिचार्थ भागत असून, ऐन सणासुदीत चार पैसे मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
पारोळा (जळगाव) : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे सर्वच व्यवसायांना उतरती कळा लागली आहे. यात विवाह सोहळ्यांवर बंधने घातल्याने यावर आधारित व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मंडप व्यावसायिकांचे तर लाखो रुपयांचे साहित्य धुळखात पडून आहे. यामुळे उसनवारी व कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या विवंचनेत ते आहेत. मात्र, यातूनही मार्ग काढत काही व्यावसायिकांनी आपल्या व्यावसायाची दिशा बदलवून दिवाळीनिमित्त फराळ विक्री केंद्र सुरू केले आहे.
शहरात अनेक केटरर्स व आचारी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळ विक्री केंद्र सुरू केले आहेत. त्यामुळे अनेकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. रूचकर व खुसखुशीत फराळ मिळत असल्याने ग्राहकही या फराळाल पसंती देत आहेत. या व्यवसायातून अनेक कुटुंबांचा चरिचार्थ भागत असून, ऐन सणासुदीत चार पैसे मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
मजुरांनाही मिळाले काम
एकीकडे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले पारोळा शहर राजकारणाची पाठशाळा म्हणून ओळखले जाते. मात्र, शहरात सावित्री फायर वर्क येथील उद्योग सोडला तर कोणताच रोजगार नाही. त्यातच आता कापूस वेचणीही अंतिम टप्प्यात आल्याने मजुरांना काम नाही. हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गास फराळ विक्री केंद्रामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोरोनाने परिस्थितीनुसार जीवनात किंवा आपल्या व्यवसायात बदल करण्याचे शिकविले एवढे मात्र निश्चित!
संपादन ः राजेश सोनवणे