esakal | गांव तसे चांगल पण समस्यांनी वांगल, काय आहे कारण, वाचा !
sakal

बोलून बातमी शोधा

गांव तसे चांगल पण समस्यांनी वांगल, काय आहे कारण, वाचा !

गावातील सांडपाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होत नसल्याने गावातील प्रत्येक गल्लीत दूषित सांडपाणी साचुन दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे,

गांव तसे चांगल पण समस्यांनी वांगल, काय आहे कारण, वाचा !

sakal_logo
By
चंद्रकांत चौधरी

पाचोरा : सुमारे 1500 लोकवस्तीचे कृषिनिष्ठ असलेल्या मोहाडी (ता पाचोरा )या गावात दिवसागणिक सुविधा वाढून ग्रामस्थांचे आरोग्य व राहणीमान धोक्यात येत असल्याने हे गाव समस्यांचे माहेर बनत आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती या दोन्ही यंत्रणा सुस्त असुन ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

मोहाडी या गावात पिण्याच्या शुद्ध पाण्याची पुरेशी व नीटनेटकी व्यवस्था नाही, गावातील सांडपाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होत नसल्याने गावातील प्रत्येक गल्लीत दूषित सांडपाणी साचुन दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, जिल्हा परिषद व अंगणवाडीच्या खोल्या शिक्षण घेण्यायोग्य नाहीत, गावात पुरेसे दिवे नाहीत, गाव अंतर्गत व शेत रस्ते यांची दुर्दशा झालेली आहे, गटारी तील पाणी योग्य पद्धतीने वाहून जात नसल्याने ते गटारी बाहेर येऊन रस्त्यावर साचून चिखल व दल दल वाढत आहे, त्यामुळे डास ,चिलटे व दुर्गंधीचा त्रास वाढून आरोग्याची भीती वाढली आहे.

शासकिय यंत्रणेचे दुर्लक्ष

ग्रामपंचायत सदस्य बेबाबाई शिरसाट यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे सुविधां संदर्भात मागणी करून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान योग्य पद्धतीने राहण्या संदर्भात नियोजन करावे हे अशी मागणी केली. परंतु त्याकडे यंत्रणेने गांभीर्याने बघितले नाही. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी पडून असला तरी त्याचा सुविधां साठी वापर केला जात नाही. ज्या भागात भुयारी गटारीचे काम झाले आहे तेथेही लहान-मोठ्या जलवाहिन्या टाकून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला आहे .याबाबत संबंधित यंत्रणेने चौकशी करावी व ग्रामस्थांना न्याय द्यावा.

ग्रामंपचायत सदस्यांनी दिले निवेदन
ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या वतीने गावातील सुविधां कडे लक्ष दिले जात नसल्याने सुनील पाटील, विनोद पाटील, दीपक पाटील, ज्ञानेश्‍वर महाजन, शिवलाल नाईक, सुनील राठोड या तरुणांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यात असुविधांचा पाढा वाचून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

" मोहाडी गावात अस्वच्छतेमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्ते ,वीज, पाणी, गटारी या प्राथमिक मूलभूत सुविधा देखील योग्य पद्धतीने पुरवल्या जात नाहीत. जी कामे झाली आहेत ती देखील योग्य नाहीत. न्यायासाठी पंचायत समितीकडे तक्रार अर्ज करून सुविधांची मागणी केली आहे"
- सुनील पाटील (ग्रामस्थ मोहाडी) 
 

संपादन- भूषण श्रीखंडे