बँकेचा अधिकारी अन्‌ शेतकऱ्याकडून लाच; घरातही सापडले दहा लाख

संजय पाटील
Thursday, 3 September 2020

तक्रार करण्यासाठी शेतकरी बँकेत गेला होता. मात्र, संशयितांनी रोकड स्वरुपात लाच न घेता शेतकऱ्याकडून बेरर चेक घेतला. तो गुरुवारी (ता. ३) वटविला. त्यातील २५ हजार रुपये पंटरने व ५० हजार रुपये स्वत: व्यवस्थापकाने ठेवून घेतले.

पारोळा : येथील बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकाने पीककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून ७५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीनंतर बँकेच्या व्यवस्थापकासह पंटरला पुणे येथील चौकशी पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. 

बँक व्यवस्थापक किरण ठाकरे व खासगी पंटर नरेंद्र पाटील अशी संशयितांची नावे आहेत. यातील बँक व्यवस्थापक ठाकरे याने एका शेतकऱ्याच्या कर्ज मंजुरीसाठी आठ टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केली होती. संबंधित शेतकऱ्याचे कर्ज ७ लाख १० हजार रुपये मंजूर झाले होते. याबाबत तक्रार करण्यासाठी शेतकरी बँकेत गेला होता. मात्र, संशयितांनी रोकड स्वरुपात लाच न घेता शेतकऱ्याकडून बेरर चेक घेतला. तो गुरुवारी (ता. ३) वटविला. त्यातील २५ हजार रुपये पंटरने व ५० हजार रुपये स्वत: व्यवस्थापकाने ठेवून घेतले. याबाबत संबंधित शेतकऱ्याने पुणे सीबीआयकडे तक्रार दिली होती. त्यावरून पथकाने बुधवारी (ता. २) याबाबत सर्व पडताळणी केली. दोघा संशयितांविरोधात गुरुवारी (ता. ३) गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना अटक झाली आहे. 

घरात दहा लाखांची रोकड 
पथकाने व्यवस्थापकाच्या घराची झडती घेतली असता, घरात तब्बल दहा लाखांची रोकड आढळून आली. ती रक्कम जप्त करण्यात येऊन पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पुण्याच्या सीबीआयचे निरीक्षक आनंद रुहीकर यांच्या पथकाने दिली. 

पारोळा पोलिस अनभिज्ञ 
येथील बँक आँफ बडोदा शाखेत पुणे येथील बँकिंग क्षेत्रातील सीबीआय पथक दोन दिवसांपासून पारोळ्यात तळ ठोकून लाच प्रकरणाची चौकशी करीत होते. मात्र, येथील पोलिसांना याबाबत माहिती विचारली असता, आमच्याकडे बँकेसंदर्भात कोणतीही तक्रार किंवा संदेश मिळाला नसल्याचे उत्तर मिळाले. शहरात बँक व्यवस्थापक शेतकऱ्याकडे लाच मागण्याचे धाडस करीत असताना, याबाबत पोलिस अनभिज्ञ कसे याबाबत शहरात चर्चा सुरू होती. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola Bank official and bribe from a farmer