पीडित तरुणीच्या कुटुंबास आठ लाखाची मदत; पालकमंत्र्यांनी घेतली कुटूंबियांची भेट

संजय पाटील
Thursday, 12 November 2020

गुलाबराव पाटील यांनी पीडित तरुणीची आई व मामा यांची भेट घेऊन आरोपीना जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी असून आपणास न्याय मिळेल अशा शब्दात सांत्वन केले

पारोळा (जळगाव) : टोळी (ता.पारोळा) येथील वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार होउन तिचा खून झाल्यानंतर याबाबत सदर घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. या अनुषंगाने आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील यांनी पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वन करीत राज्य शासनाकडून सदर कुटुंबास एकूण 8 लाख 25 हजाराची मदत घोषित केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुटूंबियांची भेट आज सायंकाळी घेतली. यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, प्रांत विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, शहर तलाठी निशिकांत पाटील, सहायक बीडीओ विजय आहिरे, विस्तार अधिकारी सुनील पाटील, पं.समिती सदस्य राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी पीडित तरुणीची आई व मामा यांची भेट घेऊन आरोपीना जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी असून आपणास न्याय मिळेल अशा शब्दात सांत्वन केले. यावेळी पिडीत मुलीच्या आईने कसोदा येथील संशयित महिलेस अटक करण्याची मागणी केली. 

8.25 लाखाची मदत घोषित
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाजकल्याण विभागाचे सहायक योगेश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून सदर कुटुंबास एकूण 8 लाख 25 हजार रूपयांची मदत घोषित केली. सदर मदत ही अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंध अधी नियम समितीच्या कमिटीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मंजुर करण्यात आली. यात प्रथम 4 लाख व नंतर दुसऱ्या टप्प्यात 4 लाख 25 हजार रूपये पीडित तरुणीच्या वारसांना देण्यात येणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola eight lakh assistance to the victim's family guardian minister visited the families