
ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदानाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर उमेदवार निश्चित करण्याचे काम देखील सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये बडे नेते देखील लक्ष घालत असून, ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असतो. त्याच अनुषंगाने निवडणुक बिनविरोध करण्यासाठी आमदार निधीतून रक्कम देण्याचे आश्वासन आतापासून देण्यात आले आहे.
पारोळा (जळगाव) : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका येवू घातल्या आहेत. अशात एरंडोल तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत विकासासाठी २१ लाख रूपयांचा निधी देणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी जाहिर केले.
माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. परंतु, राज्यासह संपुर्ण विश्वात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अजुन फारसा थांबलेला नाही. त्यामुळे कोरोना भयावह परिस्थितीत गेल्या मार्च महिन्यापासून प्रशासनाचा सहकार्याने शासन सर्वोतोपरी प्रयत्न करून परिस्थिती योग्य प्रकारे हाताळत आहे. अशा कोरोना भयावह परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
याकरीता देणार २१ लाख
निवडणुक काळात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये. गावातील एकोपा टिकून राहावा, कोरोनाचे संकट बळावू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर ताण येऊ नये व निवडणुक खर्चाची बचत व्हावी. याकरीता एरंडोल विधानसभेचे आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित निवडणुकीसाठी पात्र असलेल्या ग्रामपंचायतींनी निवडणुक न होऊ देता बिनविरोध निवडणुक पार पाडली; अशा ग्रामपंचायतींना त्यांचा स्थानिक आमदार निधी कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकासासाठी 21 लक्ष रूपये देणार असल्याचा निर्णय घेतला. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी हा निर्णय आमलात आणण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
संपादन ः राजेश सोनवणे