महाजनांचे खडसेंवर पून्हा टिकास्त्र; मी मी पणा करणारे गेल्याने पक्षाला काही फरक पडणार नाही !  

संजय पाटील
Wednesday, 28 October 2020

पैशांशी निष्ठा असणारे, मी मी करत पक्ष सोडत असून, त्यांच्या अन्यायाची व्याख्या त्यांनाच माहीत, असा टोला नाथाभाऊंचे नाव न घेता लगावला.

पारोळा : चाळीस वर्षे ज्यांना पक्षाने अनेक पदे दिली, परंतू माझ्यावर अन्याय झाला असे जिल्ह्यात चित्र रंगवले गेले. यात काही तथ्य नसून भाजप हा व्यक्ती प्रेमाचा पक्ष नसून, कोणी आले किंवा गेले म्हणून काहीही फरक पडणार नाही. मी मी करणारे गेल्याने भगदाड काय, साधे छिद्र देखील पक्षाला पडणार नसल्याचा टोला आमदार गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे नाव न घेता पारोळा बैठकीत लगावला. 

बोहरा सेंट्रल स्कूल येथे घेण्यात आलेल्या या बैठकीस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, नूतन संघटनमंत्री रवी अनासपुरे, किशोर काळकर, नीलेश महाजन, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, एरंडोल नगराध्यक्ष रमेश परदेशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब पाटील, भाजप गटनेते नगरसेवक बापू महाजन, दीपक अनुष्ठान, प्रकाश महाजन, नवल सोनवणे, कैलास चौधरी, मनीष पाटील डी. बी. पाटील, रेखा चौधरी उपनगराध्यक्ष जयश्री बडगुजर, अनिल पाटील, पी. जी. पाटील यांच्यासह आदी पारोळा-एरंडोल विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवा- भोळे

जिल्हाध्यक्ष आमदार भोळे यांनी ही बैठक अभ्यास वर्ग असून, कार्यकर्त्यांनी इतरांसारखी अन्यायाची भूमिका सार्वजनिक मांडू नये, पक्षाने अनेक पदे देऊनही जर कोणी पक्ष सोडत असेल तर ते दुर्दैवी असून, जळगाव जिल्हा पक्षाचा बालेकिल्ला असून, पक्षाचे कार्य, ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. 

 

वल्गना करणाऱ्यांना फुगा फुटणारच ! 
महाजन यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडतांना म्हणाले, की तसेच नाव न घेता पैशांशी निष्ठा असणारे, मी मी करत पक्ष सोडत असून, त्यांच्या अन्यायाची व्याख्या त्यांनाच माहीत, असा टोला नाथाभाऊंचे नाव न घेता लगावला. मतदार संघात पुढील आमदार भाजपचा असेल असे सांगून कोणाला कितीही वल्गना करू द्या, त्यांचा फुगा लवकरच फुटेल, असे सांगत भाजप हा ठाकरे व पवारांसारखे घराणेशाहीवर चालणारा पक्ष नसल्याचे सांगून सरकारी यंत्रणेवर विश्वास नसल्याने अजित पवार खासगी ‘ब्रीच कॅन्डी’ रुग्णालयात उपचार घेत असल्याची टीका केली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola not matter if girish mahajan leaves the party accusing eknath Khadse