आई मॅडम आल्‍यात बघ दारी..हा प्रसंग आहे आनंदाचा

संजय पाटील
Saturday, 17 October 2020

शिक्षण विभागाने आँनलाईन प्रणालीतून शिक्षण सुरु केले असले तरी तालुक्यात मोबाईल नेटवर्कचा अभाव तर बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून अनेकांना मुकावे लागत आहे.

पारोळा (जळगाव) : मार्च महिन्यापासून कोरोनामुळे शैक्षणिक सत्र पुर्णपणे बंद आहे. शिक्षण विभागाकडून आँनलाईन प्रणालीद्वारे अभ्यास घेतला जात असला; तरी पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. तांत्रिक अडचणींचा सामना सध्या तरी शिक्षण विभाग करित आहे. परंतु कोरोना सारख्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये; यासाठी भोंडण दिगर (ता.पारोळा) येथील जि. प.च्या शिक्षिका सविता विश्वनाथ पाटील हे विद्यार्थ्यांच्या घरी जावुन त्यांना अभ्यासाची गोडी व अभ्यासाचे नियोजन करुन देत आहेत.

जगासह देशावर कोरोना संक्रमणाचा प्रभावाने सर्वांना ‘बुरे दिन’ आल्याचे दिसत आहे. त्यात शाळा बंद असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. शिक्षण विभागाने आँनलाईन प्रणालीतून शिक्षण सुरु केले असले तरी तालुक्यात मोबाईल नेटवर्कचा अभाव तर बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून अनेकांना मुकावे लागत आहे.

प्रत्‍येकाचे घर झाले शाळा
सदरची बाब लक्षात घेता तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सविता पाटील यांनी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद शिक्षण चालु या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जावुन भाषा व गणित या विषयाच्या स्वत: तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करुन त्या सोडविणेसाठी मार्गदर्शन करित आहेत. यामुळे पालक वर्गाकडून जि. प. शिक्षण आपल्या दारी आल्याचा अनुभव घेत आहे. शिक्षिका सविता पाटील यांना याकामी मुख्खाध्यापक प्रशांत देवाजी पाटील, गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शिक्षक बांधवसह शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

आमदार पाटलांकडून कौतुक 
सध्या खासगी शिक्षण संस्थेकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल व त्यांची शैक्षणिक पध्दतीकडे विद्यार्थ्यांचे आकर्षण असते. त्यामुळे शासनाच्या जि. प. शिक्षणाकडे पालक वर्ग नेहमी पाठ फिरवित असतात. मात्र, जि. प. शाळेतून देखील उत्तम ज्ञानदान व चांगले संस्कार देवुन आदर्श विद्यार्थी घडविले जातात. याची अनेक उदाहरणे आहेत. तालुक्यात बऱ्याच शिक्षण संस्थेकडुन आँनलाईन शिक्षण प्रणालीतुन विद्यार्थांचा अभ्यास घेतला जात आहे. मात्र ग्रामीण भागात मोबाईल व नेटवर्कचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये यासाठी शिक्षिका सविता पाटील यांची विद्यार्थ्यांप्रती तळमळ पाहता ते प्रत्येक विद्यार्य्थांच्या घरी जावुन शिक्षण सेवा देत असल्याने आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करुन शिक्षणाबाबत अडचणी निर्माण झाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola teacher home to home teaching student