केळीवर ‘कुकुंबर मोझॅक’चे संकट, दोन हजार हेक्टरवर प्रादुर्भाव 

प्रदीप वैद्य 
Wednesday, 26 August 2020

जवळपास सर्वच कंपन्यांच्या टिश्‍युकल्चर रोपांवर कमी-अधिक प्रमाणात हा रोग पडला आहे. फेकाव्या लागणाऱ्या सीएमव्ही रोगग्रस्त केळी खोडांवर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे.

रावेर : जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या ग्रीन बेल्टमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) रोगाने या वर्षीही पुन्हा डोके वर काढल्याने केळीची रोपे उपटून फेकण्याची वेळ केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. जुलैत लागवड केलेल्या टिश्युकल्चर रोपांवर या रोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, जिल्ह्यातील किमान दोन हजार हेक्टर केळीवर हा रोग आला आहे. यातील किमान दोनशे हेक्टर केळी शेतकऱ्यांनी उपटून फेकली आहेत. संततधारेने आणि ढगाळ वातावरणामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. 

केळी उत्पादकांनी सांगितले, की जी टिश्युकल्चर केळी रोपे जुलैत लागवड झाली आहेत केवळ त्याच रोपांवर सीएमव्ही रोग आढळून येत आहे. त्यापूर्वी लागवड झालेल्या केळीवर या रोगाचे प्रमाण नगण्य आहे. जवळपास सर्वच कंपन्यांच्या टिश्‍युकल्चर रोपांवर कमी-अधिक प्रमाणात हा रोग पडला आहे. फेकाव्या लागणाऱ्या सीएमव्ही रोगग्रस्त केळी खोडांवर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. पंधरा रुपयांचे एक याप्रमाणे टिश्युकल्चर रोपांची किंमत शेतकऱ्याने रोख दिली असून, या केळी बागांवर नांगरणी, वखरणी, लागवड, फवारणी आणि विविध खते असा प्रतिखोड किमान २५ ते ३० रुपये खर्च केलेला आहे. 

...या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 
तालुक्यातील अहिरवाडी येथील संजय चौधरी यांच्या दहा हजार केळी खोडांपैकी पाच हजार केळी खोडे त्यांनी यापूर्वी उपटून फेकली असून, उर्वरित खोडेदेखील फेकावी लागण्याची शक्यता त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. केऱ्हाळे बुद्रुक येथील विशाल पाटील यांनी दहा हजार, महेंद्र पाटील १२ हजार, सुरेश पाटील सहा हजार, पांडुरंग पाटील एक हजार, भागवत पाटील दहा हजार, प्रवीण पाटील नऊ हजार, गोपाळ पाटील चार हजार, सुभाष महाजन चार हजार, संजय पाटील आठ हजार, तर संदीप पाटील यांनी तीन हजार केळी खोडे उपटून फेकली आहेत. 

काकडीजन्य पिकांतून केळीत... 
परिसरात असलेल्या काकडीजन्य पिकांमधून (टरबूज, चवळी, मका, कापूस, ऊस, टोमॅटो, मिरची, कारली आणि वेलवर्गीय पिके) येणाऱ्या किडीपासून केळीत या रोगाचा फैलाव होतो. केळीबाग स्वच्छ करणे, केळीवर फवारणी करणे, मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी यांचा बंदोबस्त करणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करत राहणे असे उपाय या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आहेत. 

या गावांमध्ये अधिक प्रभाव 
रावेर तालुका : लोहारा, सावखेडा, विवरे खुर्द, निंभोरा, ऐनपूर, सांगवे, विटवा, अहिरवाडी, केऱ्हाळा, उटखेडा, भातखेडा, चिनावल, कुंभारखेडा, दसनूर, वाघोदा. 
मुक्ताईनगर तालुका : नाचणखेडा, पातोंडी पिंप्रीनांदू, शेमळदा 
जामनेर तालुका : हिवरखेडा, भडगाव तालुका : घुसर्डी 

रोगग्रस्त खोडे उपटून नष्ट करा : के. बी. पाटील 
सीएमव्ही रोगग्रस्त केळी खोडे उपटून फेकावीत आणि नष्ट करावीत, केळीबागेत निंबोळी अर्क, इमिडा आदींची फवारणी करावी, असे आवाहन जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांनी केले आहे. त्यांनी रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात रोगग्रस्त केळीबागांची पाहणी केली. श्री. पाटील म्हणाले, की सीएमव्ही हा रोग सुमारे ७७ वर्षांपूर्वीचा आहे. पूर्वी शेतकरी यास हरणे रोग म्हणत असत. जुलै-ऑगस्ट महिन्यात लागवड झालेल्या केळीच्या छोट्या बागांवर या रोगाचे आक्रमण होत आहे. 

नुकसानीचे पंचनामे करा : आमदार शिरीष चौधरी 
सीएमव्ही या रोगापासून नुकसान टाळण्यासाठी शासनातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, केळी उत्पादकांच्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, त्याचप्रमाणे विषाणू निर्देशांक (व्हायरस इंडेक्सिंग) केलेली ऊतिसंवर्धित रोपे शेतकऱ्यांना मिळावीत, यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे. या रोगावर वेळीच उपाययोजना होण्यासाठी आमदार चौधरी यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, कृषी सचिव, मुंबई व जिल्हा कृषी अधिकारी, जळगाव यांना मंगळवारी पत्र लिहिले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver Banana frut crop crisis of cucumber mosaic Illness