भाजपचा व्हाट्सअप गृप झाला राष्ट्रवादीचा, मग काय भाजप कार्यकर्त्यांची झाली पंचाईत !

दिलीप वैद्य 
Monday, 26 October 2020

 ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर ॲडमिन श्री चौधरी यांनी आज ग्रुपचे नाव बदलून "आर सी पार्टी मुक्ताईनगर" असे केले.

रावेर :  "भारतीय जनता पक्ष, मुक्ताईनगर" या नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी होते. आता बदललेल्या परिस्थितीत या व्हाट्सअप ग्रुपचे नाव "एनसीपी मुक्ताईनगर" असे झाले असून असंख्य भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते या ग्रुप मध्ये आहेत. ते या ग्रुपमध्ये राहतात की ग्रुपबाहेर पडतात याची गमतीदार चर्चा सध्या येथे सुरू आहेत.

 जसे व्यक्तीच्या नावात काही नसते तसे व्हाट्सएप ग्रुपच्या नावातही काही नसते असे म्हणावे लागेल. मुक्ताईनगर येथील पिंप्रीनांदू येथील युवा कार्यकर्ते
 अक्षय चौधरी यांनी २१ मे २०१६ ला "भाजपा मुक्ताईनगर" या नावाने व्हाट्सअप ग्रुप सुरू केला होता. या ग्रुप मध्ये भारतीय जनता पक्षाचे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, प्रदेश सरचिटणीस अशोक कांडेलकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन यांच्यासह योगेश कोलते, राजू माळी, विजय चौधरी,पांडुरंग नाफडे आदींचा समावेश आहे. गमतीदार गोष्ट अशी की या ग्रुपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आदींचाही समावेश आहे. या ग्रुपवर भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातील घडामोडी शेअर होत असतात.

 ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर ॲडमिन श्री चौधरी यांनी आज ग्रुपचे नाव बदलून "आर सी पार्टी मुक्ताईनगर" असे केले आणि सोबत ३ घड्याळे दर्शविली आहेत. तर ग्रुपमधील अन्य सदस्य नितीन खडसे यांनी ग्रुपच्या नावात पुन्हा बदल करून "एनसीपी मुक्ताईनगर" असे केले आहे. श्री खडसे आणि जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे छायाचित्रही डीपीवर आहे. बदललेल्या परिस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते श्री खडसे यांच्या मागे उभे राहतील असे दिसते.या परिस्थितीत भारतीय जनता पक्षातच राहणार असलेले नेते आणि कार्यकर्ते आता राष्ट्रवादी काँग्रेस या नावाच्या आणि घड्याळ चिन्ह असलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर राहतील काय याबाबतची गमतीदार चर्चा सध्या सुरू आहे. एखाद्या पक्षाच्या व्हाट्सअप ग्रुप वर राहिल्याने  कार्यकर्त्यांच्या कार्यात आणि निष्ठेत काही फरक पडत नसला तरी भारतीय जनता पक्षाची शिस्त वेगळीच असल्याने ग्रुपमधील सदस्यांचे याकडे लक्ष आहे.दरम्यान, ग्रुपचे नाव बदलताच ५ जणांनी ग्रुप सोडला आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver BJP's WhatsApp group became the NCP's, so the BJP members in the group got into trouble